नागपूर : पंतप्रधान मोदी १० एप्रिल रोजी रामटेक मतदार संघात | पुढारी

नागपूर : पंतप्रधान मोदी १० एप्रिल रोजी रामटेक मतदार संघात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात येत्या 10 एप्रिल रोजी जाहीर सभेसाठी येणार आहेत. त्यासोबतच 14 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातही पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची माहिती आहे. यासोबतच ते पवित्र दीक्षाभूमी येथेही भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर,भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि रामटेक अशा पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान अभिनेता गोविंदा रामटेक लोकसभा मतदारसंघात व त्यानंतर यवतमाळ तसेच हिंगोली मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहे. एकीकडे नागपुरात कडक उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी प्रचार रंगात येऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार दोन दिवस नागपूर,पूर्व विदर्भात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत,शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार अशी अनेक मंडळी पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा निवडणूक क्षेत्रात प्रचाराच्या निमित्ताने व्यस्त आहेत. आज वर्धा लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार अमर काळे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी स्वतः शरद पवार,माजी गृहमंत्री अनिल देशमुख हजर होते. उद्या अकोला व वर्धा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नामांकन दाखल करणार आहेत. एकंदरीत वाढत्या तापमानासोबतच पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचारा मुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

Back to top button