उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप | पुढारी

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ‘शासन आपल्या दारी’ अभियानाद्वारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवून त्याचे जीवन सुखकर करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या अभियानांतर्गत नागपुरात प्रशासनाने २० लाख लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचविण्याचे उद्दिष्ट गाठावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शासन आपल्या दारी कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

मॉडेल मिल चौकातील गाडीखाना क्रीडा मैदानावर मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार विकास कुंभारे यांनी ‘शासन आपल्यादारी’ अभियानांतर्गत आयोजित केलेल्या शिबिरात फडणवीस बोलत होते. आमदार प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील जनतेला सरकारी योजनांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत दीड कोटी जनतेला लाभ देण्यात आला आहे. नागपुरात या कार्यक्रमांतर्गत विविध शिबिरांचे आयोजन करून आजपर्यंत ७ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

हेही वाचंलत का?

Back to top button