अमरावतीत ठाकरे गटात बंडखोरी, दिनेश बुब यांचा ‘प्रहार’मध्ये प्रवेश | पुढारी

अमरावतीत ठाकरे गटात बंडखोरी, दिनेश बुब यांचा 'प्रहार'मध्ये प्रवेश

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून बंडखोरी करत शिवसेनेचे संपर्कप्रमुख दिनेश बुब यांनी शुक्रवारी (२९) प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. ते प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

संबंधित बातम्या 

प्रचंड विरोध असतानाही महायुतीत भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रहार अमरावती लोकसभेत उमेदवार देणार, अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगानेच हा उमेदवार त्यांनी दिला आहे.
शुक्रवारी प्रहारचे मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब यांनी शहरातील आजाद हिंद मंडळाच्या प्रांगणात प्रहारमध्ये प्रवेश केला. यावेळी बुब हे प्रहारकडून अमरावती लोकसभेचे उमेदवार असतील, अशी घोषणाही करण्यात आली.

बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगाने सर्व जबाबदारी ही राजकुमार पटेल यांना दिली आहे. त्यामुळे पटेल यांच्या उपस्थितीत दिनेश बुब यांचा प्रवेश आणि उमेदवारी घोषित करण्यात आली. प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत अमरावतीत लोकसभेसाठी उमेदवार द्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळे आम्ही अमरावतीत मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा निर्णय घेतला आहे. बुब हे आमचे उमेदवार असतील असे यावेळी पटेल म्हणाले.

दिनेश बुब हे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंपासून तर उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत एकनिष्ठ होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने अमरावती लोकसभेवरून दावा सोडल्याने आणि हा मतदार संघ काँग्रेसला गेल्यामुळे दिनेश बुब हे नाराज होते. त्यामुळे आता त्यांनी प्रहारमध्ये प्रवेश करून महाविकास आघाडीसह ठाकरे गटालाही धक्का दिला आहे.

…तर शिवसेनेचा राजीनामा देणार : दिनेश बुब

दरम्यान बुब यांना या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा मागितला तर देणार का?, या प्रश्नाच्या उत्तरा दाखल बुब यांनी राजीनामा मागितला तर देऊ असे सांगितले. प्रहार ही संघटना शिवसेनेतून निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा वेगळा पक्ष नाही. राजीनामा देणे अथवा शिवसेना रक्तातून काढणे शक्य नाही. हा भावनिक विषय आहे. भगवा झेंडा हाती घेऊनच निवडणुकीला सामोरे जाणार असेही ते म्हणाले.

महायुतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे घेणार नाही : बच्चू कडू

दरम्यान बच्चू कडू यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वेळ पडल्यास महायुतीमधून बाहेर पडू पण कुठल्याही स्थितीत अमरावती लोकसभेतून उमेदवार मागे घेणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आपण नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देण्यावर ठाम आहोत. आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ, असेही ते म्हणाले.

Back to top button