निमा समिटचे फलित : स्टार्टअप्सच्या पंखांना ६५ कोटींचे बळ, गुंतवणूकदारांचे मानले आभार | पुढारी

निमा समिटचे फलित : स्टार्टअप्सच्या पंखांना ६५ कोटींचे बळ, गुंतवणूकदारांचे मानले आभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमधील स्टार्ट अप्सना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन बड्या गुंतवणूकदारांनी दिले असून, निमा स्टार्टअप समिटमध्ये त्याबाबत 65 कोटींचे करार प्रत्यक्षात येण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्रात नवनवीन आविष्कार घडविणाऱ्या आणि विशेषतः महिला व युवा उद्योजकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.

स्टार्टअप्स तसेच उद्योजकांना विविध पातळीवरून मदत आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने निमा सातत्याने प्रयत्नशील असते. आता स्टार्टअप समिटच्या माध्यमातून अनेक स्टार्टअप्सना आर्थिक मदत मिळवून देण्यात निमाचे योगदान मोलाचे राहिले, असे बेळे यांनी सांगितले. व्यासपीठावर निमाचे सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोषाअध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव विरल ठक्कर, स्टार्टअप समितीचे समन्वयक श्रीकांत पाटील, सतीश कोठारी, नितीन आव्हाड, किरण खाबिया, किरण वाजे, सुधीर बडगुजर, प्रकाश गुंजाळ आदी होते.

ज्या स्टार्टअप्सने उत्पादकीय मॉडेल बनविले होते, त्यांच्यासाठी निमा समिटमध्ये प्रदर्शनीय दालन उपलब्ध करून दिले होते. वित्त साहाय्यासाठी मुंबई, पुणे, बंगळुरू नाशिक तसेच राज्याबाहेरीलही गुंतवणूकदारांना पाचारण करण्यात आले होते. सुमारे 75 ते 80 गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासमोर स्टार्टअप चालकांनी आपल्या स्टार्टअपचे सादरीकरण केले. 50 लाखांपासून 25 कोटींपर्यंतची मागणी स्टार्टअप्स चालकांनी गुंतवणूकदारांकडे केली. त्यात 65 कोटींचे करार प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर झाला आणि हेच या समिटचे खरे फलित म्हणावे लागेल.

शुक्रवारी (दि. २६) दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील सेमिनारमध्ये इएसडीएसचे संस्थापक पीयूष सोमाणी यांनी आपली यशोगाथा उलगडून सांगितली. कठोर परिश्रम जिद्द आणि चिकाटी असेल तर कितीही आव्हाने आले तरी त्यावर मात करून तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता, असेही त्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांच्या सत्रानंतर स्टार्टअप व गुंतवणूकदार यांच्यामध्ये परस्पर संवाद बैठका झाल्या. दोन दिवसांच्या समिटमध्ये नाशिक व इतर शहरातील जवळपास 2000 हून अधिक उद्योजक, महिला, व्यापारी, शासकीय अधिकारी यांनी भेट दिली. स्टार्टअप समिट समारोपप्रसंगी सर्व सहभागी स्टार्टअप व महिला उद्योजिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्टार्टअप समिटला सहकार्य केलेल्या अशोक बिझनेस कॉलेज, नवजीवन कॉलेज, काकासाहेब वाघ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही यावेळेस गौरवण्यात आले.

Back to top button