रेशन धान्य घोटाळा : तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यासह सातजणांना दोन वर्षांची शिक्षा | पुढारी

रेशन धान्य घोटाळा : तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यासह सातजणांना दोन वर्षांची शिक्षा

अकोला : पुढारी वृत्तसेवा : अकोल्यात तब्बल चोवीस वर्षांपूर्वी उजेडात आलेल्या रेशन धान्य घोटाळा (Ration Scam) प्रकरणात तत्कालीन पुरवठा अधिकारी आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांच्यासह सात सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष पाटील आणि तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश चव्हाण यांचा समावेश आहे. याखेरीज ट्रान्स्पोर्ट कॉन्ट्रॅक्टरला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यातील संतोष पाटील हे सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अकोला आणि वाशीम जिल्ह्यांतील नागरिकांना रेशनकार्डवर वितरित करण्यात येणारा ४५ लाख ७३ हजार २२६ रुपये किमतीचा ४८ ट्रक गहू परस्पर गायब केल्याचा आरोप या प्रकरणातील संशयित आरोपींवर होता. त्यावेळी ट्रान्स्पोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून रामदयाल गुप्ता कार्यरत होता. त्याने हा गहू मालेगाव, मंगरूळपीर, रिसोड आणि वाशीम येथे न पोहोचवता संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून परस्पर गायब केला होता. न्यायालयाने रामदयाल गुप्ता याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. (Ration Scam)

हेही वाचा : 

Back to top button