‘संत्रा प्रक्रिया उभारण्याचे स्वागतच मात्र, आयात शुल्क कमी करा!’ | पुढारी

'संत्रा प्रक्रिया उभारण्याचे स्वागतच मात्र, आयात शुल्क कमी करा!'

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संत्रा, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळांसाठी कॅलिफोर्निया मानल्या जाणाऱ्या विदर्भात राज्य सरकारने ५ संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी घेतला आहे. संत्रा उत्पादकांना त्याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे सरकारचे मत आहे.

संबंधित बातम्या

अर्थातच हा दिर्घकालीन उपाय असून शेतकऱ्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लगेचच फायदा होईल असे नाही, असे मत काटोल, वरुड, नरखेड भागातील जानराव कुसरे, जागो पवार, केशव मधूमटके या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी महात्मा फुले मार्केटमध्ये ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांचा जर खरंच फायदा करायचा असेल तर शेतकऱ्यांना एमआरजीएसमधून कामे दिली पाहिजेत, याचा शेतकऱ्यांना फायदा झाला असता. यासोबत बांगलादेशमध्ये जाणारा संत्रा पिकांची आयात थांबली आहे. कमालीचे आयात शुल्क वाढवून ठेवले असून ते कमी करायला पाहिजे. यावेळी मोठ्या प्रमाणावर संत्रा पिकूनही शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकला नसल्याने तो कवडीमोल भावात विकावा लागत आहे.

यापूर्वी देखील संत्रा प्रक्रिया प्रकल्पांच्या घोषणा झाल्या. मात्र, प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळाला नाही. हिवाळी अधिवेशन आले की, हा प्रश्न ऐरणीवर येतो. कधीकाळी फुकट संत्री विधानभवन परिसरात माजी आमदार सुनील शिंदे यांनी वाटली अशी आठवण यानिमित्ताने काढली आहे. यामुळेच आज तातडीने आयात शुल्क कमी व्हावे, जेणेकरून निर्यात वाढेल, पैसे मिळतील, शेतकरी दीर्घकालीन घोषणांवर समाधानी नाही अशी प्रतिक्रीया शेतकरी मंगेश देशमुख यांनी व्यक्त केली.

Back to top button