शेतकऱ्याची अडचण वाढली ! सहा महिन्यांत दूधदर 10 रुपयांनी पडले | पुढारी

शेतकऱ्याची अडचण वाढली ! सहा महिन्यांत दूधदर 10 रुपयांनी पडले

जामखेड : पुढारी वृतसेवा :  गेल्या महिन्यात दूधाचा दर 31 रुपयांवरून 27 रुपयांवर आला असून, पुढील काळात दर आणखीन कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय असलेला दूध धंदा अडचणीत आला आहे. पर्यायाने शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत जनावरांचा चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चारा विकत घेण्याची वेळ आली असताना; मात्र दुसरीकडे दूधाचे दर कमी झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

संबंधित बातम्या :

त्यामुळे सरकारने दूध दर वाढवले नाही तर, ऐन दिवाळीत शेतकर्‍यांवर दिवाळं निघाल्याशिवाय राहणार नाही. दूधाचे दर गेल्या महिनाभरात चार रुपयांनी कमी झाल्याने शेतकर्‍यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. गेल्या सहा महिन्यांत दूधाचे 3-5,8-5चा दर 37 रुपये होता. नोव्हेंबर महिन्यात दूधाचा दर 27 रुपये झाल्याने तब्बल 10 रुपयांनी दूध दर कमी झाल्याने दुष्काळात तेरवा महिना झाल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून येत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. अन्यथा दूध उत्पादक शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

शेतकर्‍यांनी शेतीचे उत्पन्न घेण्याऐवजी जनावरांच्या चार्‍यासाठी शेतीचे क्षेत्र आरक्षित करत दूध व्यवसाय वाढविला होता. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी जनावरांच्या खाद्यावर खर्च करत होता. दूधाला भाव होते म्हणून शेतकर्‍यांनी हरियाणा, पंजाब, बंगळूर येथून 30 ते 35 लिटर दूध देणार्‍या गायी आणल्या होत्या. दूधाला चांगले दर होते म्हणून शेतकर्‍यांनी मोठा खर्च करत दावणीला लाखोंची जनावरे बांधले. दुधापासून मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला.

पशुखादयांचे भाव गगनाला
शेतकर्‍यांच्या दूध व्यवसायाला चांगले दिवस असताना अचानक दूधाचे दर घसरले. दुसरीकडे गायीसाठी लागणारे पशुखाद्यांचे भाव मात्र गगनाला भिडले. सरकी, खपरी, गोळी आदींचे भाव मोठ्याप्रमाणात वाढले. यामुळे दूधाचे दर कमी झाले, तर पशुखाद्यांचे दर कमी व्हावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

भाव स्थिर राहण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न गरजेचे
शेतकरी मुख्य व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहत होता; परंतु शेतीमालाच्या भावाप्रमाणे दूधाचे भाव स्थिर राहत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकारने भाव स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे शेतकर्‍यांचे म्हंणने आहे.

चुकीच्या धोरणाचा फटका शेतकर्‍यांना : हजारे
ऐन दिवाळीच्या तोंडावर दूधाचे भाव कमी झाल्याने शेतकर्‍यांची दिवाळीकडू झाली आहे. गेल्या महिनाभरापासून 10 दिवसांच्या मस्टरला एक रुपया कमी कमी होत आहे. गेल्या महिन्यात 31 वरून आज 27 रुपयांवर दूध दर आला आहे. यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला. शेतकर्‍यांसाठी शाश्वत व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करतो; परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. दूध दर कमी झाल्याने दूध व्यवसाय तोट्यात जात असल्याचे शेतकरी दादासाहेब हजारे यांनी सांगितले.

Back to top button