Devendra Fadnavis : एल्विस यादव संबंधावरून फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण | पुढारी

Devendra Fadnavis : एल्विस यादव संबंधावरून फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण, ड्रग्स माफिया प्रकरण, गणपती आरतीला त्यांच्याकडे आलेल्या लोकांवरून विरोधकांमार्फत लक्ष्य केले जात आहे. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांना यात गोवण्याचे कारण नाही. पुराव्यांशिवाय राजकीय लोकांनी कुणावरही आरोप करू नयेत, असा सबुरीचा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. (Devendra Fadnavis)

अंमली पदार्थ विरोधी अभियानामध्ये, ड्रग्स फ्री महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्र शासन गंभीरपणे काम करत आहे. ही मोठी लढाई असून यात सर्वपक्षीयांचे सहकार्य अपेक्षित आहे. तरुणाईला विळख्यात ओढणाऱ्या या व्यवसायात जे- जे कोणी सहभागी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ज्या लोकांनी अंमली पदार्थांच्या फॅक्टरी टाकून इतरांना जहर देण्याचे काम केले आहे. आधी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कुणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही. इतकेच नव्हे तर जे पोलीस, ज्यांनी हा सर्व धंदा सुरू राहू दिला. त्यांच्यावर केवळ निलंबन नाही, तर बडतर्फीची कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)

पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करण्यात अर्थ नाही. ललित पाटील प्रकरणात केले गेलेले आरोप इकडून तिकडून फिरून शेवटी त्यांच्याजवळच पोहोचले. हे आपण बघितलेले आहे. राजकीय आरोप करणाऱ्यांनी गांभीर्याने ते केले पाहिजेत. पुरावे दिल्याशिवाय कोणीही बोलू नये. सार्वजनिक जीवनात कोणालाही बदनाम करण्याची गरज नाही. काळजीपूर्वक बोलावे, गणेशोत्सवामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात. यात अनेक सेलिब्रिटी असतात. मुख्यमंत्र्यांकडे एल्विस यादव येऊन गेला. तेव्हा रिअॅलिटी शो जिंकलेला असल्यामुळे तो सेलिब्रिटी होता. यात उगीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याचे काहीच कारण नाही. असेच आरोप जर झाले तर राज्यातल्या अनेक पुढाऱ्यांना अटक होऊ शकते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे असे ते बोलत असल्याचा आरोप फडणवीस यांनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली.

हेही वाचा 

Back to top button