Gadchiroli Murder Case: दवंडी येथील दुकानदाराच्या खूनप्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक | पुढारी

Gadchiroli Murder Case: दवंडी येथील दुकानदाराच्या खूनप्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: तीन दिवसांपूर्वी झालेल्या कोरची तालुक्यातील दवंडी येथील लखन सोनार या किराणा दुकानदाराच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून पत्नीनेच प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या सहकार्याने आपल्या पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बळीराम गावडे (रा.कुकडेल), सुभाष हरिराम नंदेश्वर (रा. दवंडी) व सरिता लखन सोनार (रा. दवंडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. (Gadchiroli Murder Case)

दवंडी येथील किराणा दुकानदार लखन सोनार (वय ३८) याची ११ ऑक्टोबरच्या रात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. माझा पती लखन सोनार हा रात्री घरी झोपला असताना पाच ते सहा जण तोंडाला काळे रुमाल बांधून आले. त्यांनी लखनची धारदार शस्त्राने हत्या करुन पोबारा केला, अशी तक्रार लखनची पत्नी सरिता हिने बेळगाव पोलिस मदत केंद्रात केली होती. त्यावरुन कोरची पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. परंतु ३६ तास उलटूनही आरोपींचा शोध लागला नव्हता. अखेर पोलीस निरीक्षक फडतरे आणि उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी यांनी मृताचे नातेवाईक आणि गावकऱ्यांकडे चौकशी केली असता सत्य पुढे आले. (Gadchiroli Murder Case)

लखनची पत्नी सरिता हिचे गावातीलच सुभाष नंदेश्वर याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती-पत्नीत नेहमी वाद होत असे. तो तिला मारहाणही करायचा. त्यामुळे पतीच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी पत्नी सरिता हिने प्रियकर सुभाष नंदेश्वर यास हकीकत सांगून पतीचा काटा काढण्यासाठी तगादा लावला. पुढे ९ ऑक्टोबरला दोघांनी लखनच्या हत्येचा कट रचून बळीराम गावडे याच्यावर हत्येची जबाबदारी सोपवली. त्यानंतर ११ ऑक्टोबरच्या रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास बळीराम गावडे याने लखनची हत्या केली, अशी कबुली सरिताने दिली. अखेर तपासाअंती तिघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button