गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास | पुढारी

गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर भरदुपारी अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल कवडू म्हशाखेत्री (वय ४०) असे दोषी आरोपीचे नाव असून, तो गडचिरोली तालुक्यातील दर्शनीमाल येथील रहिवासी आहे.

३० मे २०१८ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पीडित मुलगीवर आरोपी अनिल म्हशाखेत्री याने अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती. यामुळे पीडित मुलगी बेशुद्ध झाली असतानाही आरोपीने तिला एका शौचालयात डांबून ठेवले. मुलीला डांबून ठेवल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांनी तिला बाहेर काढले त्यानंतर या घटनेची पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी अनिल म्हशाखेत्री याच्यावर भादंवि कलम ३६३, ३७६(२)(३) व ३४२, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन अटक केली. तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे व पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज (दि. ५) या प्रकरणाचा निकाल लागला. वैद्यकीय अहवाल, पीडितेचे बयाण आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम मुधोळकर यांनी आरोपी अनिल म्हशाखेत्री याला २० वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेशही न्यायालयाने पारित केला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी बाजू मांडली.

Back to top button