गडचिरोली : ११ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षली तरुणीचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण | पुढारी

गडचिरोली : ११ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षली तरुणीचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली,; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याने सुमारे ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या जहाल महिला नक्षलीने आज पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी(२८) असे आत्मसमर्पित नक्षलीचे नाव असून, ती छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील ईरुपगट्टा येथील रहिवासी आहे.

रजनी वेलादी ही २००९ मध्ये छत्तीसगडमधील फरसेगड दलममध्ये भरती झाली. त्यानंतर ओरछा दलम, नॅशनल पार्क दलम आणि सांड्रा दलममध्ये ती कार्यरत होती. ४ चकमकी, १ खून आणि १ जाळपोळीच्या गुन्ह्याची तिच्यावर नोंद आहे. आत्मसमर्पण योजनेंतर्गत तिला साडेचार लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. २०२२ पासून आतापर्यंत १३ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याचे नीलोत्पल यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता आणि यतीश देशमुख उपस्थित होते.

छत्तीसगडमधील नक्षल्यांना गडचिरोली पोलिसांवर विश्वास

अलीकडच्या काळात छत्तीसगड राज्यात सक्रिय असलेले अनेक नक्षलवादी गडचिरोलीत येऊन आत्मसमर्पण करीत आहेत. याविषयी विचारले असता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, छत्तीसगडच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाची आत्मसमर्पण योजना अधिक चांगली आहे. २०१४ मध्ये राज्य सरकारने त्यात काही बदल केल्यानंतर नक्षल्यांच्या गडचिरोली पोलिसांप्रती विश्वास वाढला आहे. गडचिरोली पोलिसांतर्फे आत्मसमर्पित नक्षल्यांना भूखंड देण्यात येत असून, त्यांची स्वतंत्र वसाहत निर्माण करण्यात आली आहे. शिवाय त्यांना रोजगारही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील नक्षलवादी गडचिरोलीत येऊन आत्मसमर्पण करीत असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

हेलिकॉपटरच्या नाईट लँडिंगचा प्रस्ताव तयार

नुकतीच नक्षलग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक झाली. यात नक्षलविरोधी अभियान राबविताना रात्रीच्या वेळी हेलिकॉप्टरची गरज भासते. त्याअनुषंगाने प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आणि अन्य तीन दुर्गम पोलिस मदत केंद्रांची हेलिकॉप्टरची नाईट लँडिंग करण्यासाठी निवड केल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Back to top button