वर्धा, पैनगंगा व इरई नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चंद्रपूरला पूराचा धोका! | पुढारी

वर्धा, पैनगंगा व इरई नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चंद्रपूरला पूराचा धोका!

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, इरई व पैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोरपना तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगेनेही धोक्याची घंटा दिल्याने चंद्रपूर शहरात बॅक वॉटरमुळे पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा, गोंडपिपरी , कोरपना तालुक्यातील नागरिकांन सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. बॅक वॉटरने चंद्रपूर शहरातीत काही वार्डातील सखल भागात पाणी घुसण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात संतंतधार पाऊस कोसळल्याने नदी नाले तंडूब भरले तर शेजारी यवमामाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. तर वर्धा येथील वर्धा अप्पर व लोअर प्रकल्पातून पाण्या मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. तर शेजारी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्दचे पाणी वैनगंगेला येत आहे. तसेच पैनगंगाही नदी पात्राबाहेर वाहू लागल्याने वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळेच चंद्रपूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. चंद्रपूर शहरालगत वर्धा व इरई नदी वाहते. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आज रविवार पासून सकाळ पासून बल्लारपूर लगतच्या वर्धा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने चंद्रपूर बल्लारपूर राजूरा मार्ग बंद होवून पूराचा धोका अधिक वाढला आहे. बल्लापूर शहरालगत असलेल्या रेल्वेच्या लोहापूलापर्यंत वर्धेचे पाणी पोहचले आहे. त्यामुळे सायंकाळपासून राजूरा बाम्हणी बल्लारपूर मार्ग बंद झाला आहे.

राजूरा सास्ती मार्गावरही पाणी साचल्याने हा मार्ग बंद झाला आहे. शिवाय दोन दिवसांपासून अनेक मार्ग बंद आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, पैनगंगा व इरई आदी तिन्ही नद्या पात्राबाहेर वाहू लागल्याने वर्धा नदीचे पाणी पुढे जाण्यास अडचण झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर तालुक्यातील इरई नदीच्या काठावरील पदमापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आवड, नांदगाव पोडे, भटाडी, वडोळी, चिचोली, कडोली, पायली, विचोडा, खैरगाव चांदसूर्ला, विचोडा बुजूर्ग, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती चारवट, कवठी, चेक तिरवाजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आदी गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे इरई नदीच्या काठावरील वास्तव्यास असलेल्या नागरिकाना सतर्क राहण्याची सुचना देण्यात आलेली आहे. पूरपरिस्थीशी लढण्यासाठी सर्व सुविधा निर्माणकरण्याच्या सुचना देण्यात आलैल्या आहेत. संकटाचा सामना करण्याकरीता सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या आहेत.

अप्पर वर्धा धरणांमधून १४०० कुसेक्सने पाणी सोडले असल्यामुळे वर्धा , पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोरपणा तालुक्यातील ज्या २२ गावांना पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. सर्व गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावातील आपत्ती व्यवस्थापन टिमला सतर्क राहण्याचे कळविण्यात आले आहे. तलाठी, ग्रामसेवक यांनी मुख्यालयी राहून पोलीस पाटील, सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांचे सतत संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत. नदी काठावरील गावातील घरे पाण्याखाली जावू शकतात. त्यांना सुरक्षित निवाराच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी संबधीत निवारागृह उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश आहेत. पूरस्थितीच्या धोकादायक ठिकाणी कोणीही जावू नये. याकरीता गावात निरोप, दवंडी द्यावी देऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरीता सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले आहे. वर्धा नदीचे पाणी बल्लापूर शहरातीली गोल पुलियाजवळ पोहचल्याने शहरात जाणारा रस्ताही बंद झाला आहे. त्यामुळे पाणी वाढतच राहिला तर बल्लारपूरलाही धोका आहे. वर्धा पैनगंगा व इरईच्या नदीच्या पुरामुळे रेल्वे प्रवास प्रभावित होण्याची शक्यता आहे. राजूरा तालुक्यातील काही मार्ग बंद झाल्याने सुपर फॅास्ट रेलवेचा थांबा सध्या माणिकगड चुनाळा येथे देण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले आहे. ऐरवी चुनाळा येथे फक्त पॅसेंजर थांबतात. परंतु पुरस्थिती लक्षात घेता चुनाळा येथे सुपर फॉस्ट रेल्वे थांबणार आहेत.

पात्राबाहेर वाहू लागलेल्या वर्धा नदीचे पाणी बॅक वॉटर वाहू लागले आहे. बॅक वॉटरमुळे चंद्रपूर शहराच्या दिशेने पाणी वाहत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहराला पूराचा धोका निर्माण झाला आहे. सखल भागातील वार्डात पाणी साचत आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या इरई धरणाचे सध्या दरवाजे उघडले नाहीत परंतु इरई धरणाच्या क्षेत्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रपूर शहराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सध्या चंद्रपूर, बल्लारपूर शहरालगत सर्वत्र क्षेत्रात पुराचे पाणीच पाणी दिसत आहे. शेतांना समुद्राचे स्वरूप आले आहे.

Back to top button