बुलढाणा: बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी ६ संशयितांना अटक | पुढारी

बुलढाणा: बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी ६ संशयितांना अटक

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील परिक्षा केंद्राबाहेर शुक्रवारी (दि. ३) गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेची दोन पृष्ठे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. पेपरफुटीच्या या प्रकरणी साखरखेर्डा (ता.सिंदखेडराजा) पोलिसांनी आज (दि.४) शेंदूरजन, बिबी, किनगावजट्टू व भंडारी या गावातील ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर अधिक चौकशी करत असून पेपरफुटीचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि.३) इयत्ता १२वी चा गणित विषयाचा पेपर होता. सकाळी १०.३० च्या दरम्यान साखरखेर्डा जवळील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयातील परीक्षा केंद्राबाहेर बारावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेची दोन पृष्ठे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची बातमी पसरली.

याबाबतचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून तत्काळ प्रसारित झाल्यानंतर राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. विधीमंडळातही हा पेपरफुटीचा विषय गाजला. याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले. नंतर शुक्रवारी रात्री गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी पेपरफुटीची सिंदखेडराजा पोलिसांत तक्रार नोंदवली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी तो साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. साखरखेर्डाचे ठाणेदार नंदकिशोर काळे, नितीन जाधव व रामदास वैराळ यांच्या तपास पथकाने सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा 

बुलढाणा : सिंदखेडराजाच्या नामांतरासाठी शासनस्तरावर हालचाली; पण स्थानिकांचा विरोध 

बुलढाणा : तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू; करवंड येथील घटना

बुलढाणा : वरवंट बकाल येथे स्वाभिमानीचा रास्ता रोको; रस्त्यावर कापूस व कांदे टाकून सरकारचा निषेध

Back to top button