अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वनमजूरांना आवश्यक साहित्याचे वाटप | पुढारी

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वनमजूरांना आवश्यक साहित्याचे वाटप

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला नुकतेच दि. २२ फेब्रवारी २०२३ रोजी ५० वर्ष झाली. प्रकल्पाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे. याचे औचित्य साधून नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील १९६४ साली वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांनी अकोट वन्यजीव विभागातील शहानूर पर्यटन केंद्र येथे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले.

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २८ डॉक्टरांनी ‘शहापूर पर्यटन केंद्र’ येथे अकोट वन्यजीव विभागातील ३४ संरक्षण कुटी तसेच सिपना वन्यजीव विभागातील ३१ संरक्षण कुटी असे एकुण ६५ संरक्षण कुटीवर कार्यरत असलेल्या संरक्षण वनमजुरांसाठी मच्छरदाणी, पिण्याच्या पाण्याचे पिंप, विजेऱ्या आदी साहित्यांचे वाटप केले.

मेळघाटातील गाभा क्षेत्रात संरक्षण कुटीवर रात्रंदिवस काम करणारे वनमजूर हे वने व वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी वर्षभर कर्तव्यावर हजर राहतात. यात त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी वने व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करणे केवळ वन विभागाचे काम नसून यामध्ये सहकार्य करणे हे सामान्य नागरिकांचेही कर्तव्य असल्याची भावना डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालिका श्रीमती ज्योती बॅनर्जी यांनी व्याघ्र प्रकल्पामार्फत डॉक्टर चमूचे आभार मानले.

हेही वाचा; 

Back to top button