उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले | पुढारी

उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महिलांच्या थकित वेतनाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे हनुमान चालीसा पठण करण्यास जाणाऱ्या कार्यकर्त्यांना सोमवारी (दि.१३) पोलिसांनी रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. युवा परिवर्तन की आवाज वर्धा जिल्हाध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात गेले काही दिवस महिलांचे आंदोलन सुरू आहे.

आम्ही शांततापूर्ण पद्धतीने हे आंदोलन करीत असताना पोलिसांनी आम्हाला रोखले, ही दडपशाही नाही तर काय? आम्ही पाकिस्तानात जाऊन हनुमान चालीसा पठण करायची का? असा संताप कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला. यानंतर विभागीय आयुक्तांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. मंगळवारी (दि.१४) वर्धा येथे या प्रश्नावर बैठक घेतली जाईल, असे आश्वासनही दिले. त्यानंतर हे आंदोलक शांत झाले. युवा परिवर्तन की आवाज वर्धा जिल्हाध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात गेले काही दिवस महिलांचे आंदोलन सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान वर्धा प्रभाग संघ व्यवस्थापक महिलांच्या थकीत वेतन मागणीसाठी संविधान चौकात नागपुरातील संविधान चौकात हे आंदोलन सुरू आहे. आश्वासन दिल्यानुसार, बैठकीत समाधान न झाल्याने न झाल्यास छुप्या मार्गाने नागपूरचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.

विशेष म्हणजे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा,आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना मुंबईत मातोश्रीपुढे हनुमान चालीसा पाठ करण्याची अनुमती सरकारला मागितली होती. सरकारने ती नाकारली. यावेळी विरोधीपक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालीसा पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? असा सवाल केला होता. आज या आंदोलनाच्या निमित्ताने फडणवीस यांना कार्यकर्त्यांनी त्याचेच स्मरण करून देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचलंत का?

Back to top button