अमृता फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त विधान भोवले; खेमदेव गरपल्लीवार तडीपार | पुढारी

अमृता फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त विधान भोवले; खेमदेव गरपल्लीवार तडीपार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानावर समाजमाध्यमातून अश्लील टिपण्णी केली गेली. या प्रकरणी गोंडपिपरी येथील एकाला थेट जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. खेमदेव गरपल्लीवार असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील खेमदेव गरपल्लीवार हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. ते गोंडपिपरीच्या ग्रामपंचायतीचे सदस्य होते. सध्या त्यांच्या पत्नी शारदा गरपल्लीवार गोंडपिपरीच्या नगरसेविका आहेत. त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या. यानंतर गरपल्लीवार दाम्पत्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यादरम्यान अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायावरुन एक विधान केले होते. यावर खेमदेव गरपल्लीवार यांनी अमृता फडणवीस यांच्याविरोधात समाजमाध्यमातून अश्लील टिपण्णी केली होती.

या प्रकरणी भाजपने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यानच्या काळात खेमदेव गरपल्लीवार व त्यांच्या पत्नी नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकांच्या जमिनी हडप करणे, विनयभंग करणे, धमकाविणे, मारहाण करणे, शांतता व सुव्यवस्था भंग करणे या प्रकरणी गरपल्लीवार यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button