चंद्रपूरमध्‍ये जेरबंद केलेल्‍या वाघाचा उपचारावेळी मृत्‍यू | पुढारी

चंद्रपूरमध्‍ये जेरबंद केलेल्‍या वाघाचा उपचारावेळी मृत्‍यू

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वन परिक्षेत्रातील व्याहाड उपवन क्षेत्रातील सामदा भागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ४ जानेवारीला जेरबंद करण्यात आले होते. पुढील देखभालीसाठी नागपूरच्या गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आणण्यात आले होते. तातडीने त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू (Death Of Tiger) झाला. मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होऊ शकेल. नियमानुसार गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र परिसरातील दहनगृहात मृत वाघाचे दहन करण्यात आले.

सुमारे 3 वर्षांच्या या नर वाघाची (Death Of Tiger) काही दिवसांपासून परिसरात दहशत होती. कैलास खेडेकर या शेतकऱ्याचा त्याने बळीसुद्धा घेतला होता. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने बेशुद्ध करीत व्याहाड बुज कॅनल परिसरातून त्याला जेरबंद केले होते. यावेळी केंद्राचे उपसंचालक डॉ. व्ही. एम. धूत, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील रोगनिदान शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पी. एम. सोनकुसरे, विषयतज्ज्ञ डॉ. मयूर पावशे, डॉ. शालिनी ए. एस., पशुधन विकास अधिकारी डॉ. किशोर भदाने, डॉ. भाग्यश्री भदाने उपस्थित होते.

संचालक डॉ. बहार बाविस्कर, मुख्य वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक उधम सिंग यादव, यांच्या समक्ष शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. शवविच्छेदनानंतर वाघावर परिसरातील दहनगृहात दहन करण्यात आले. यावेळी गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत, सहाय्यक वनरक्षक एच. व्ही. माडभुषी, वनपरिक्षेत्र अधिकारी निलय. एस. भोगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :  

Back to top button