चंद्रपूर : नागभिड ब्रम्हपूरी मार्गावर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन; तासभर वाहतूक खोळंबली | पुढारी

चंद्रपूर : नागभिड ब्रम्हपूरी मार्गावर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन; तासभर वाहतूक खोळंबली

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ब्रम्हपूरी नागभिड मार्गावरील सायगाटाजवळ मंगळवारी (दि.३) सायंकाळी 5 च्या सुमारास एका वाघिणीने बछड्यांसह रस्ता पार करताना अनेकांना दर्शन दिले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांची रीघ लागली होती. तब्बल अर्धा-पाऊण तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वनविभाग व पोलिस विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली.
ब्रम्हपुरीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरील सायगाटा परिसर जंगल व्याप्त आहे. याच परिसरात एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला होता. तेव्हापासून मारुती मंदिराकडे जाणारा रस्ता कठडे लावून बंद करण्यात आला आहे. या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो. सध्या या परिसरात अस्वल असल्याची माहिती आहे. मात्र, मंगळवारी वाघीण बछड्यांसह रस्ता पार करताना दिसून आल्याने परीसरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. तसेच यावेळी अनेक प्रवाशांनी पर्यटनाचा आनंद लूटला.
वनविभागाला माहिती कळताच रस्त्यावर गस्त वाढविण्यात आली. कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून पोलिस विभागाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी तब्बल तासभर वाहतूक खोळंबली असल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा

Back to top button