नागपूर : महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात | पुढारी

नागपूर : महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : २३ वर्षानंतर प्रथमच महाराष्ट्रात मिनी ऑलिम्पिक स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. १ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये एकूण ३९ क्रीडा प्रकारात असणार आहेत शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, मुंबई व नागपूर संत्रानगरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतील बॅडमिंटन, हँडबॉल, नेटबॉल व सेपक टेकरा या चार क्रीडा स्पर्धा २ ते ८ जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीनंतर विद्यार्थ्यांचा कल मोबाईलकडे वळला असून त्यांना पुन्हा खेळाविषयी आवड निर्माण व्हावी. तसेच या स्पर्धेतून त्यांचे क्रिडा विषयकचे करिअर घडावे यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी छात्रक, भंडाऱ्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, हँडबॉल संघटनेचे सुनील भोतमांगे, शिव छत्रपती पुरस्कार अवार्डी योगेंद्र पांडे, बॉल संघटनेचे विपीन कामदार, ललित जीवाणी, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अमंत आपटे, आदी यावेळी उपस्थित होते.

नुकतेच महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या लोगोचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीष महाजन, विरोधी पक्षनेते तथा अध्यक्ष महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक संघटना अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धेचे ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व क्रीडा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. येत्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंमध्ये वातावरण निर्मिती व्हावी, हाच या स्पर्धेचा उद्देश आहे.

हेही वाचा

Back to top button