यवतमाळ : ईसापूर धरण ९९.४० टक्के भरले, दोन दरवाजे उघडले | पुढारी

यवतमाळ : ईसापूर धरण ९९.४० टक्के भरले, दोन दरवाजे उघडले

उमरखेड (यवतमाळ), पुढारी वृत्तसेवा : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या ईसापूर धरणाची पाणी पातळी ४४०.९४ मिटरपर्यंत पोहोचली आहे. पाणीसाठा १२७३.२३ दशलक्ष घनमीटर एवढा झाला आहे असून ईसापूर धरण ९९.४० टक्के भरले आहे.

त्यातच पाणलोट क्षेत्रामधील बंधाऱ्यामधून होत असलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता इसापूर धरणाच्या मंजूर प्रचलन आराखड्यानुसार धरणामध्ये अपेक्षित पाणीसाठा कायम ठेवून येणाऱ्या पाण्याची आवक पाहता प्रकल्प प्रशासनाने सोमवारी (दि. २०) धरणाचे दोन दरवाजे ३० सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदी पात्रात ५८.१३६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला आहे.

त्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, धरणाच्या दोन दरवाजामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असताना धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून पाण्याचा विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

ईसापूर धरणांमधून पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्यानंतर निर्माण होणारी पूर सदृश्य परिस्थिती पाहता इसापूर प्रकल्प प्रशासनाने कार्यक्षेत्रातील यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्हा अंतर्गत असलेल्या कळमनुरी, पुसद ,उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट येथील तालुका दंडाधिकार्‍यांना नदी काठावरील गावांना सूचना देण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे.

 

Back to top button