बुलडाणा : इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो व्हायरल करणा-याला अटक | पुढारी

बुलडाणा : इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो व्हायरल करणा-याला अटक

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवर दुस-याच्या नावे बनावट अकाऊंट उघडून त्यावर महिलांचे नग्न फोटो पोस्ट करणा-या संशयित आरोपीला बुलडाणा सायबर पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे.

या प्रकरणातील फिर्यादी वैभव घनशाम कुटे (रा. हिवरखेड पूर्णा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) हे जालना येथील फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. तर आरोपी वैभव बाळासाहेब लोंढे (रा. शेवगल पो. पानेवाडी, ता. घनसावंगी, जि. जालना) हा औरंगाबादला शिक्षण घेत आहे.

19 जुलै 2021 रोजी वैभव कुटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या प्रोफाईल फोटोसह महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो अपलोड असल्याचे त्यांच्या मित्रांनी व भावाने लक्षात आणून दिले. यानंतर वैभव कुटे यांना धक्का बसला. त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले असता त्यांच्या अकाऊंटवरील प्रोफाईल फोटोचा व त्यांच्या नावाचा अज्ञात व्यक्तीने वापर करून त्यावरून महिलांचे अश्लील फोटो व्हायरल केल्यामुळे जनमानसात बदनामी झाली. याबाबत वैभव कुटे यांनी किनगावराजा (ता. सिंदखेडराजा) पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

हा गुन्हा ऑनलाईन तांत्रिक स्वरूपाचा असल्याने बुलडाणा येथील सायबर पोलिसांकडे तो तपासासाठी वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी तांत्रिक साधनांव्दारे शोध घेतला असता वैभव कुटे यांच्या नावे वैभव बाळासाहेब लोंढे (रा. शेवगल, ता. घनसावंगी, जि. जालना) याने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केल्याचे उघडकीस आले. आरोपीला त्याने गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल हॅन्डसेटसह उस्मानपूरा औरंगाबाद येथून अटक करण्यात आली.

बुलडाणा सायबर पोलिस स्टेशन एपीआय सुभाष दुधाळ, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश नागरे, पवन मखमले, राजू आडवे, कैलास ठोंबरे, योगेश सरोदे, शोएब अहमद यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button