नागपूर : साई भक्तांसाठी नॉनस्टॉप नागपूर-शिर्डी बससेवा गुरुवारपासून | पुढारी

नागपूर : साई भक्तांसाठी नॉनस्टॉप नागपूर-शिर्डी बससेवा गुरुवारपासून

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर लांब पल्ल्याच्या एसटी बसेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर -शिर्डी हा वेगवान महामार्ग उपलब्ध झाल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. येत्या गुरुवारी ( दि. १५ डिसेंबर) पासून राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीची नॉनस्टॉप सेवा साई भक्तांसाठी सुरू होत आहे. रात्री ९ ला ही बस प्रस्थान होवून सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास शिर्डीत पोहोचणार आहे. यामुळे सकाळीच साईबाबाचे दर्शन, शनी शिंगणापूर दर्शन, जेवण वगैरे आटोपून पुन्हा रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही बस तेथून निघून सकाळी नागपुरात येणार आहे.

७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत तर ६५ वर्षावरील प्रवाशांना निम्मे प्रवास भाडे सवलत मिळणार आहे. आज या बससेवेला ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसले. दोन दिवसात हजारो वाहने या समृद्धी महामार्गावर धावली. ठिकठिकाणी टोल दिला. यामुळे येत्या काही दिवसात हा महामार्ग खासगी बसेससाठीही उपयुक्त ठरणार हे निश्चित आहे.

समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना या समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. पुढच्या काळात नागपूर – पुणे, नागपूर -गोवा या रस्त्यांमुळे वेगवान रस्त्यांचे नेटवर्क राज्यात उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा :  

Back to top button