चंद्रपूर : नागभीड तालुक्यात चोघांचा बळी घेणारा वाघ जेरबंद | पुढारी

चंद्रपूर : नागभीड तालुक्यात चोघांचा बळी घेणारा वाघ जेरबंद

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या पट्टेदार वाघाला रविवारी (3 डिसेंबर) जेरबंद करण्यात आले. पनपरिक्षेत्रातील मिंडाला उपवन क्षेत्रातील मसली नियतन क्षेत्रात सशस्त्र पोलिसांच्या पथकाने डार्ट मारुन बेशुध्द केले. यानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. नागभीड तालुक्यातील ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या गावातील दीड महिन्यात चार जणांचा बळी घेतला आहे. वाघाला जेरबंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यात काही दिवसांपासून नर जातीच्या पट्टेदार वाघाने (पिट 2) नागभीड तालुक्यातील एका महिलेस ठार केले होते. त्यानंतर ढोरपा जवळ असलेल्या टेकरी या शेतशिवारात तोरगाव येथील वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाली होती. तर याच आठवड्यात ढोरपा येथील सविता भुरले या महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या अगोदर पान्होडी येथील गुराख्यास वाघाने ठार केले होते. त्यामुळे इरव्हा (टेकरी), मौशी, ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या परिसरात वाघाची चांगली दहशत पसरली होती. शेतकरी शेतमजूर व नागरिकांनाच्या जीवाला पट्टेदार वाघापासून धोका निर्माण झाल्याने डार्ट मारून जेरबंद करण्याचे आदेश नागपूरचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (जीव) यांनी दिला होता.

तेव्हा पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सशस्त्र पोलीस अजय मराठे व पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत तुपकर वाघावर पाळत ठेवून होते. रविवारी नागभीड वनपरिक्षेत्रांतर्गत मिंडाळा उपवनक्षेत्रातील मसली नियतक्षेत्रात दुपारच्या सुमारास वाघ आढळून आला. सशस्त्र पोलीस अजय मराठे यांनी अचूक निशाना साधून डार्टने त्याला बेशुध्द केले. त्यांनतर अर्धातासांनी त्याला पिंजऱ्यात सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले. वाघाला जेरबंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. जेरबंद करण्यात आलेला नर जातीचा वाघ अडीच ते तीन वर्ष वयाचा आहे. त्याला पुढील तपासणीकरीता चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button