

चेन्नई; पुढारी ऑनलाईन : दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील लाखो रुग्णांची वैयक्तिक माहिती हॅकर्सनी चोरल्यानंतर आता तमिळनाडूतील एका रुग्णालयावर सायबर हल्ला करुन दीड लाख रुग्णांच्या डेटावर हॅकर्सनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. (Hacking Patient Information)
तामिळनाडूतील श्री सरन मेडिकल सेंटरच्या 1.5 लाख रुग्णांचा वैयक्तिक डेटा हॅकर्सनी चोरल्याचे समोर आले आहे. हा डेटा सायबर क्राइम फोरम आणि टेलिग्राम चॅनेलवर विकला गेला. सायबर थ्रेट फोरकास्टिंग फर्म CloudSEK ने या डेटा चोरीची माहिती दिली आहे. CloudSEK च्या मते, चोरीला गेलेला डेटा 2007 ते 2011 या काळात रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांशी संबंधित आहे. हॅकर्सनी संभाव्य खरेदीदारांना पुरावा म्हणून एक नमुना शेअर केला. लीक झालेल्या डेटामध्ये रुग्णांची नावे, जन्मतारीख, पत्ते, पालकांची नावे आणि डॉक्टरांच्या तपशीलांचा समावेश आहे. (Hacking Patient Information)
हॅकर्सनी रुग्णांच्या डेटाची किंमत १०० अमेरिकन डॉलर्स सांगितली आहे. याचा अर्थ डेटाबेसच्या अनेक प्रती विकल्या जातील. डेटा ज्याला सर्वात प्रथम हवे असेल त्याला 300 युएस डॉलर खर्च करावे लागतील. त्याचवेळी, ज्या खरेदीदारांना डेटा पुढे विकायचा आहे, त्यांच्यासाठी ही किंमत 400 युएस डॉलर इतकी सांगितले गेली आहे.
नुकताच दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) वर झालेल्या सायबर हल्ल्यात लाखो रुग्णांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेला आहे. चोरलेला डेटा डार्क वेबवर विकला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर हल्ल्यादरम्यान चिनी हॅकर्सनी एम्सच्या पाच मुख्य सर्व्हरला लक्ष्य केले होते. चोरलेल्या डेटामध्ये राजकारणी आणि सेलिब्रिटींसह व्हीव्हीआयपींच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे.
हेही वाचा :