विदर्भ : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार | पुढारी

विदर्भ : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथे शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या एका ५७ वर्षीय महिलेवर दोन वाघांनी हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली. वनिता वासुदेव कुंभरे (वय ५७ ) असे मृतक महिलेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पहार्णी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतक-यांचे शेतावर जाणे बंद झाले आहे. वनविभागाने वाघांच्या बंदोबस्तासाठी तातडीने या ठिकाणी पिंजरा लावला असून त्यामध्ये रेडा बांधण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, शनिवारी नेहमी प्रमाणे एक किमी अंतरावरील पहार्णी शेतशिवारात वनिता कुंभरे ही महिला कुटुंबासोबत गवत घेण्याकरीता गेली होती. कुटूंबीयांनी सायंकाळी तीन वाजेपर्यंत शेतात पाणी देण्याचे काम केल्यांनतर ते घरी परत आले. मात्र महिला शेतावरच गवत घेत होती. सायंकाळ होवूनही ती घरी परत आली नाही. त्यामुळे कुटूंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरु केली. शेतात गवत आणि गवत घेण्याकरीता वापरण्यात आलेली विरूली पडून असल्याचे आढळून आली. काही अंतरावर पुढे जावून शोध घेतला असता मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे नागरिकांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी दोन वाघ आढळून आल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गर्दी असूनही वाघ इतरत्र पळून जाण्यास धजावत नव्हते. बराचवेळ वाघांनी एकाच ठिकाणी बस्थान मांडले होते. नागरिकांवरही वाघ गुरगुरत होते. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास अडचण आली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाघांनी घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. परंंतु धड व मुंडके वेगवेगळे झाले होते. शनिवारी रात्री धड मिळाल्यानंतर मुंडके मात्र आढळून आले नाहीत. आज सकाळी पुन्हा शोधाशोध केली असता काही अंतरावर मुंडके आढळून आले. सदर महिलेचा मृत्यू दोन वाघांच्या हल्यात झाल्याचे दोन्ही वाघांच्या ओढताणी मध्ये मुंडके व धड वेगळे झाले. मृतक महिलेला पती, दोन मुले व एक मुलगी आहे.

वाघाच्या बंदोबस्तासाठी पिज-यात बांधला रेडा

पहार्णी परिसरात काही दिवसांपासून दोन वाघांचे दर्शन होत आहेत. काल शनिवारी दोन वाघांनी एका महिलेचा बळी घेतल्यानंतर प्रचंड दहशत पसरली आहेशेतक-यांनी शेतावर जाणे बंद केले आहे. या घटनेची दहशत लक्षात घेता वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. पिंज-यात रेडा बांधण्यात आला आहे.

Back to top button