अमरावती : कारची बसला धडक; भीषण अपघातात ११ मजूर ठार | पुढारी

अमरावती : कारची बसला धडक; भीषण अपघातात ११ मजूर ठार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा :  कार बसला धडकून  झालेल्या अपघातात ११ मजूर ठार झाले. हा भीषण अपघात परतवाडा ते बैतुल रोडवरील झल्लार या गावाजवळ गुरुवारी (दि. ३) मध्यरात्री झाला. मृतांमध्ये ५ पुरुष, ४ महिला आणि २ मुलांचा समावेश आहे. प्रधानमंत्री सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना  २ लाख रुपये आणि जखमींना १० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
या अपघातातील मृतांची नावे अशी, लक्ष्मण सुखराम भुस्मकर (वय 30 रा.मेंढा, किशन लीलाजी मावस्कर ( वय 32 रा.महातगाव),  कुसुम किशन मावस्कर (वय 28 रा.महातगाव), अनारकली केजा मावस्कर (वय35, रा.महातगाव), संध्या केजा (वय 5), अभिराज केजा (वय दीड वर्ष), अमर धुर्वे सहबलाल धुर्वे (वय ३५, रा. चिखलार), मंगल नन्हेसिंग उईके (वय ३७), नंदकिशोर धुर्वे (वय ४८), श्यामराव रामराव झारबडे (वय४०) आणि रामकली श्यामराव (वय ३५ रा. चिखलार) मृतांमध्ये महातगाव येथील पती-पत्नी आणि आईसह दोन मुलांचा समावेश आहे. गावातील किशन आणि त्याची पत्नी कुसुम यांच्याशिवाय अनारकली आणि तिची ५ वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.  झल्लार येथे मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.
मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील परतवाडा रोडवरील झल्लार गावात रात्री दोनच्या सुमारास बस आणि तवेरा कारची धडक होऊन कारमधील ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ पुरुष, ४ महिला आणि २ मुलांचा समावेश आहे. बैतुलचे पोलीस अधीक्षक सिमला प्रसाद यांनी सांगितले की, झल्लारजवळ रिकाम्या जाणाऱ्या (एमपी 48 पी 0193) या बसची आणि कारची धडक झाली. कारमधील सर्व लोक मजूर आहेत. ते सर्व जण महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावी परतत होते. अपघात झालेल्या कारचा काही भाग कापून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की, कार चक्काचूर झाली. याशिवाय बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. या अपघातात बसचालक यशवंत पार्टे जखमी झाला. पोलिसांनी बुलडोझरच्या साहाय्याने गाडी हटवली. २० दिवसांनी मजूर आपापल्या घरी सोयाबीन कापणीसाठी परतत होते. चालकाचे  नियंत्रण सुटले आणि भरधाव कार  बसवर धडकली.
बैतुलचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनीही ट्विटरच्या माध्यमातून पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचलंत का ? 
 

Back to top button