पुढारी ऑनलईन डेस्क : T20 World Cup New Rules : ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार शिगेला पोहोचला आहे. न्यूझीलंडचा संघच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. सुपर-12 फेरीतील शेवटचे चार सामने शिल्लक राहिले आहेत. ग्रुप 1 मध्ये इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (5 नोव्हेंबर), तर 6 नोव्हेंबर रोजी ग्रुप 2 मध्ये द. आफ्रिका विरुद्ध नेदरलँड, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आणि भारत विरुद्ध झिम्बाम्बे हे सामने खेळले जाणार आहेत. तरी या सामन्यांनंतरच सेमी फायनलमध्ये पोहचणारे उर्वरीत तीन संघ स्पष्ट होतील. दरम्यान, ICC ने या T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल आणि फायनलच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
पूर्वी, पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि दोन्ही संघांनी किमान 5-5 षटके खेळली असतील तर डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निर्णय घेतला जायचा. त्याचवेळी, आयसीसीने यंदाच्या टी 20 विश्वचषकासाठी या नियमात बदल केला आहे. यंदा सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्यांमध्ये किमान 10 षटके खेळली जाणे आवश्यक असेल, त्यानंतरच डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे निर्णय घेतला जाईल. म्हणजेच आता नवा नियम हा 5 ऐवजी 10 षटकांच्या सामन्यानंतरच लागू होईल.
यंदाच्या टी 20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान पावसामुळे अनेक सामने रद्द करण्यात आले. त्यानंतर दोन्ही संघांना समान गुणांचे वाटप करण्यात आले. त्याच वेळी, असे काही सामने होते ज्यात 5 पेक्षा जास्त षटकांच्या खेळानंतर डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे निर्णय घेण्यात आला. ज्यात भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्याचा समावेश होता. आता आयसीसीने निर्णयात बदल केला आहे. यात सेमी फायनल आणि फायनलमध्ये किमान 10 षटकांनंतर जर सामना पूर्ण होऊ शकला नाही तरच डकवर्थ-लुईस नियम लागू केला जाईल. तसेच एकदा टॉस झाल्यानंतर संघात कोणताही बदल केला जाणार नाही आणि पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामना ज्या वेळी थांबला असेल त्याच वेळेपासून राखीव दिवशी सामना सुरू होईल. याशिवाय सेमी फायनलचा सामना राखीव दिवशीही खेळला गेला नाही, तर गटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघाला विजेता घोषित करून फायनलचे तिकीट दिले जाईल.
यावेळी आयसीसीने सेमी फायनल आणि फायनल सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवले आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सेमी फायनल सामना 9 नोव्हेंबर रोजी सिडनी तर दुसरा सेमी फायनल सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये अंतिम सामना होणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून सुरू होती.