ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेला जळगावात ब्रेक, अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारली | पुढारी

ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेला जळगावात ब्रेक, अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारली

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात पोहचली आहे. यावेळी मुक्ताईनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना जिल्ह्यात भाषण करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता मुक्तानगर येथे होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेस बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमच्या सभेला परवानगी मिळणार व सभा होणारच असा दावा केला आहे.

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा गेल्या चार दिवसापासून जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. त्यांच्या समवेत शिवसेना युवा संघटनेचे विस्तारक शरद कोळी हेही आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेवून त्यांनी जिल्हा दणाणून टाकला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिंदे गटावर सातत्याने हल्लाबोल करत आहे. यातच धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. तसेच मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सुषमा अंधारे यांची जाहिर सभेलाही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. याचसोबत शिवसेना शिंदे गटातर्फे आयोजित पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जाहीर सभेलाही परवानगी नाकारली आहे.

दानवेंनी घेतली हमी…

अंबादास दानवे शुक्रवार (दि. ४) जळगाव दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीच्या भरपाईचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना मुक्ताईनगरला अंधारे यांना सभा घेवू देण्याची विनंती केली. कोणताही वाद होणार नाही याची हमी आम्ही देतो, वाटले तर तुम्ही आम्हाला भाषण लिहून द्या तेच आम्ही वाचून दाखवितो, असेही ते म्हणाले. मात्र, परवानगी आपण द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास नकार दिला. पत्रकारांशी बोलतांना दानवे म्हणाले, मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन यात्रेच्या सभेला परवानगी मागितली आहे. ती मिळेल, असा विश्‍वास आहे. कोणीही सभेवर बंदी घालू शकत नाही. त्यामुळे महाप्रबोधन यात्रा पार पडणारच. सत्ताधारी दबावतंत्राचा वापर करत आहे, असा आरोपही अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

दोन्हीही सभा होणार नाहीत : गुलाबराव पाटील

शिंदे गटाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, मुक्ताईनगरात ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. आम्हीही त्या ठिकाणी सभेची परवानगी मागितली मात्र, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आमची परवानगी नाकारली, तसेच त्यांच्या सभेचीही परवानगी नाकारली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button