वाशिम : जिल्ह्यात ६ पैकी ५ पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा | पुढारी

वाशिम : जिल्ह्यात ६ पैकी ५ पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ६ पैकी ५ पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा तर मानोरा या पंचायत समितीचे महिला सभापती भाजपकडे असे वर्चस्व राहीले. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपिर, मानोरा आणि मालेगांव या ६ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली कारंजा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख यांनी बिनविरोध तर उपसभापती पदी वंचितच्या अलका अंबरकर यांची निवड झाली.

रिसोड पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस च्या केशरबाई हाडे तर उपसभापती पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुवर्णा नरवाडे यांची निवड झाली आहे. वाशिम पंचायत समिती सभापती म्हणून सावित्रीबाई वानखेडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) यांची तर उपसभापती पदी काँग्रेसचे गजानन गोटे यांची नियुक्ती झाली आहे.

मंगरुळपिर पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा भगत यांची तर उपसभापती पदी उषा राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. मानोरा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या सुजाता जाधव तर उपसभापती पदी मेघा राठोड यांची निवड झाली असून मालेगाव पंचायत समिती सभापतीपदी कांग्रेसच्या रंजना काळे यांची तर उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या निर्मला जाधव यांची निवड झाली आहे.

आजच्या पंचायत समिती निवडणुकीत मालेगांव आणि रिसोड पंचायत समितीमध्ये सत्तांतर झाले असून मालेगांव व रिसोड पंचायत समित्यांमधील जनविकास आघाडीची सत्ता खेचून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

हेही वाचा

Back to top button