नागपूर : मुख्याध्यापकांचे अपहरण; ३० लाखांच्या खंडणीसाठी धमकी | पुढारी

नागपूर : मुख्याध्यापकांचे अपहरण; ३० लाखांच्या खंडणीसाठी धमकी

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथील जरीपटका पोलिस ठाणे परिसरात राहणाऱ्या मुख्याध्यापकाचे मानकापूर येथून अपहरण (Kidnapped) झाल्याची घटना घडली. एका खासगी हॉस्पीटल समोरून शुक्रवारी मध्यरात्री हे अपहरण झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रदीप मोतीरामानी असे अपहरण झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे.

प्रदीप मोतीरामानी हे जरीपटका परिसरातील एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीरामानी शुक्रवारी रात्री त्यांच्या दुचाकीवरून जात होते. रात्र होऊनही वडील घरी न आल्याने मुलीने वडीलांना फोन केला. यावेळी हा फोन अपहरणकर्त्यांनी उचलला. शनिवारी दुपारपर्यत ३० लाख तयार ठेवा, नाहीतर वडिलांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

मोतीरामानी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला. तपासादरम्यान मागवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोतीरामानी यांची दुचाकी कामठी रोडवरील एका हॉस्पीटलसमोर उभी असलेली दिसून आली. रामानी हॅास्पीटलमध्ये कशासाठी गेले होते? अपहरणकर्त्यांनी त्यांना तिथे गाडी पार्क करण्यासाठी सांगितले असावे का? असे प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाले.

मुख्याध्यापक मोतीरामानी यांचे ते कार्यरत असणाऱ्या शाळेच्या संचालकांशी संबंध चांगले नव्हते, अशी चर्चा सध्या गावामध्ये आहे. पोलीस या माहितीच्या आधारे तपास करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मोतीरामानी यांच्या फोनचे शेवटचे लोकेशन मौदा येथे आढळल्याने मौदा पोलिसांना सतर्क केले असून पोलिसांचे एक पथक मौदा येथे रवाना केले आहे. या शिवाय मध्य प्रदेश व छत्तीसगढ पोलिसांनाही कळवण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button