भंडारा : वाचनालयात विद्यार्थ्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू, जिल्ह्यात खळबळ | पुढारी

भंडारा : वाचनालयात विद्यार्थ्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू, जिल्ह्यात खळबळ

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : शहरातील डॉ. हेडगेवार चौकातील संघ कार्यालयाच्या इमारतीसमोरील वाचनालयात एका विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपीला अटक करण्यात आली.अतुल वंजारी ( रा. गणेशपूर भंडारा )असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर गंगाधर निखारे (४०, रा. पवनी ) असे आरोपीचे नाव आहे ही घटना आज (दि.३ ) दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

डॉ. हेडगेवार चौकात संघाच्या कार्यालयासमोर स्व. अण्णाजी कुळकर्णी सार्वजनिक वाचनालय आहे. या वाचनालयात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसह अतुल वंजारी हा सुद्धा अभ्यासासाठी नियमित येत होता. आज दुपारी ४ च्या सुमारास अतुल वंजारी हा अभ्यासिकेत अभ्यास करीत असताना अचानक गंगाधर निखारे हा हातात एअरगन घेऊन आला. काही कळायच्या आतच त्याने अतुलवर मागेहून खांद्यावर गोळीबार केला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तो गंभीर जखमी झाला.

ही घटना घडताच अभ्यासिकेतील अन्य विद्यार्थी घाबरले. आरडाओरड झाल्यानंतर समोर असलेल्या संघातील काही पदाधिकारी धावत अभ्यासिकेत आले. आरोपी गंगाधर निखारे हा पळून जात असताना त्याला पकडून ठेवले. तात्काळ भंडारा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी अतुलला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला.याप्रकरणी आरोपी गंगाधरला पोलिसांनी अटक केली आहे.

संघ कार्यालयासमोरील वाचनालयात गोळीबार झाल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील, भंडारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाचनालय परिसरात आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण आहे.

जुना वाद कारणीभूत

मृतअतुल आणि आरोपी गंगाधर निखारे यांच्यात जुना वाद आहे. कौटूंबिक आणि पैशाच्या देवाणघेवाणीवरुन गंगाधरने अतुलवर गोळीबार करुन ठार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button