शिंदे-फडणवीस सरकारचा महाविकास आघाडीला दणका: राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द | पुढारी

शिंदे-फडणवीस सरकारचा महाविकास आघाडीला दणका: राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द केल्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे अर्थात महाविकास आघाडी सरकारला आणखी एक दणका दिला आहे. विधानपरिषदेवर नियुक्त बारा संभाव्य आमदारांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने पाठविलेली यादी शिंदे सरकारने मागे घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

तत्कालीन ठाकरे सरकारने १२ नोव्हेंबर २०२०मध्ये एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे (राष्ट्रवादी), रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर (काँग्रेस ) तर शिवसेनेच्यावतीने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नावे असलेली यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र, राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे यादी मंजूर केली जात नसल्याच्या आरोपावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये सुप्त वादही झाले होते. आता भाजपाच्या पुढाकाराने राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादीच मागे घेण्यात यावी, असे विनंती पत्र शिंदे सरकारने नुकतेच दिले होते. त्यामुळे आता ती यादी रद्द करण्यात आली आहे.
आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८, तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून या चार जागांवर मूळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागू शकतील, अशा चार जणांची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button