भंडारा : सामूहिक बलात्कारातील ‘त्या’ नराधमांना फाशी द्या : भाजप महिला मोर्चाचे पोलीस प्रशासनाला निवेदन | पुढारी

भंडारा : सामूहिक बलात्कारातील 'त्या' नराधमांना फाशी द्या : भाजप महिला मोर्चाचे पोलीस प्रशासनाला निवेदन

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : एका महिलेवर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व भंडारा जिल्ह्यातील कान्हाळमोह येथे अमानुष अत्याचार झाला. नराधमांनी तिला गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. सध्या ही पिडिता नागपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणापेक्षाही गंभीर आहे. या घटनेतील पिडितेला त्वरित न्याय मिळावा यासाठी आरोपींवरील खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, तसेच या घटनेतील नराधमांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी असणारे निवेदन भाजप महिला मोर्चाद्वारा जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्‍यात आले.

खासदार सुनील मेंढे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत या निवेदनाची सविस्तर माहिती दिली.खा. मेंढे म्हणाले, “पीडित महिलेला एवढ्या गंभीर जखमा झाल्या होत्या की, भंडारा येथे अत्याधुनिक सुविधा नसल्याने, तिला नागपूरला नेण्याशिवाय पर्याय नव्हता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याशी संपर्क करून जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

बलात्कारासारख्या घटनेमध्ये पिडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी समाजातील सर्वांची अपेक्षा असते. त्यानुसार हा खटला जलदगती न्यायालयात चालावा व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सूचना देऊन या घटनेतील तपासाकरिता एसआयटी नेमण्यात आली आहे. याच०या प्रमुखपदी सक्षम महिला पोलीस अधिकारीची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे. पिडीतेला त्वरित न्याय मिळेल अशी अपेक्षा जनतेच्या मनात निर्माण झाल्‍याचे मेंढे यांनी सांगितले.

यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, नागपूरचे माजी महापौर अर्चना डहानकर, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष इंद्रायणी कापगते, आशावरी देशमुख, विनोद बांते, गीता कोंडेवार, माला बगमारे, प्रमिला लांजेवार, मंजिरी पनवेलकर, युगकांता रहांगडाले, रोशनी पडोळे, मधुरा मदनकर, गिता सिडाम, आशा उईके, वनिता कुथे, भूमेश्वरी बोरकर, चंद्रकला भोपे, लता चौधरी, कल्याणी निखाडे, रोहिणी आस्वले, मनीषा कुथे, शोभा लांजेवार, माधुरी नखाते तसेच महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे ठरले देवदूत

गंभीर जखमी अवस्थेत पहाटे सापडलेल्या महिलेची माहिती कान्हाळमोह येथील सचिन बोरकर यांनी कारधा पोलीस स्टेशनला दिली. पीडित महिलेला वेळीच उपचार मिळण्यासाठी त्यांचे कार्य एखाद्या देवदूतासारखे असून, त्यांनी दाखविलेल्या तत्परतेने ही घटना उघडकीस आली आहे. समाजात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे हे लक्षण आहे, असेही मेंढे या वेळी म्हणाले.

पोलिसांची चूक भोवली

गोंदिया जिल्ह्यात महिलेवर अत्याचार झाल्यानंतर वाहनचालकाने तिला रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर सदर महिला भटकत लाखनीच्या पोलीस ठाण्यात आली. तेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांनी तिची आस्थेने विचारपूस केली; परंतु, पीडित महिला प्रचंड घाबरलेली आणि बोलण्याच्या स्थितीत नव्हती. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पीडित महिला पोलीस ठाण्यातून निघून गेली. या कालावधीत त्या महिलेची भरोसा सेल, महिला सेलच्या पथकाला पाचारण करुन अधिक विचारपूस केली असती तर पुढील अनर्थ टाळता आला असता, असा सूर आता उमटू लागला आहे.

हेही वाचा : 

Back to top button