नागपूर विमानतळावर वीज पडून दोन अभियंते जखमी | पुढारी

नागपूर विमानतळावर वीज पडून दोन अभियंते जखमी

नागपूर पुढारी वृत्तसेवा : गेले दोन दिवस नागपुरात विजेच्या कडकडाटासह सुरू असलेल्या पावसाचा फटका नागपूर विमानतळावरील दोन अभियंत्यांना बसला. नागपुरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वीज कोसळून दोन अभियंते जखमी झाले. उपचारानंतर दोघांची प्रकृती बरी असल्याची माहिती पुढे आली आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास अहमदाबादला जाणारे इंडिगो विमान नागपूरच्या विमानतळावर उतरत होते. या विमानाशी ग्राउंड क्लियरन्स स्टाफवर असलेले अभियंते वॉकीटॉकीवर बोलत होते. दरम्यान अचानक याच वेळेस वीज कोसळली.

वॉकीटॉकीच्या रेडिएशनमुळे दोन अभियंते विजेच्या संपर्कात आले. त्यांना वीजेचा जोरदार झटका बसला व कोसळून ते जखमी झाले. ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांना शहरातील खासगी किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दोघांची प्रकृती बरी असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे विमानतळ प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या विमानतळ प्रशासन आणखी सतर्क झाले आहे. ही घटना घडली तेव्हा विमानावर वीज कोसळल्याची चर्चा शहरात पसरली होती. त्यानंतर मात्र विमानतळावरील विमानांचे उड्डाण सुरळीत सुरू झाले आहे.

हेही वाचा

Back to top button