वर्धा: केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी | पुढारी

वर्धा: केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. त्यात शेती, पिकांसह घरांचे देखील मोठे नुकसान झाले. केंद्र शासनाच्या विशेष पथकाने मंगळवारी (दि.२) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ठिकठिकाणी पथकातील केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शेतकरी तथा नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.

या पाहणी पथकात पथक प्रमुख म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव राजीव शर्मा, जलशक्ती मंत्रालयाचे संचालक उंबरजे हरीश गिरीश, ग्रामविकास मंत्रालयाचे संचालक डॉ. माणिक चंद्र पंडीत, ऊर्जा मंत्रालयाच्या सहायक संचालक मिना हुडा यांचा समावेश होता. यावेळी पथकासोबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, शिल्पा सोनाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे यांच्यासह सेलू, वर्धा, देवळी, हिंगणघाट,समुद्रपुरचे तहसिलदार, वीज, पाणी पुरवठा, बांधकाम, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

गोंदापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सेलू तालुक्यातील गोंदापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पथकाने पाहणी केली. त्यानंतर वर्धा तालुक्यातील शिरसगाव (ध.) व देवळी तालुक्यातील सरुळ, बोरगाव (आ.) येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बोरगाव येथे पथकातील अधिकार्‍यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर बोरगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. व तेथे देखील नुकसानग्रस्तांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या.

हिंगणघाट तालुक्यातील कान्होली या गावाला भेट

पथकाने हिंगणघाट तालुक्यातील चाणकी येथील नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. याच तालुक्यातील मनसावळी येथे भेट देऊन पाहणी केली. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली या गावाला अतिवृष्टीमुळे पुराचा वेढा पडला होता. गावाचा संपर्क तुटल्याने तेथील नागरिकांना प्रशासनाने विशेष बचाव मोहीम राबवून सुरक्षितस्थळी हलविले होते. गावात पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले होते. पथकाने या गावाला भेट देवून पाहणी केली. व नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. दरवर्षी पुरामुळे गावाला धोका निर्माण होत असल्याचे गावकर्‍यांनी यावेळी सांगितले.

हिंगणघाट शहरालगत असलेल्या वणा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने लगतच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी काठावरील घरांचे देखील नुकसान झाले होते. यावेळी पथकाने पुरामुळे नुकसान झालेल्या नदी काठावरील पिकांची पाहणी केली. त्यानंतर पथकाने समुद्रपुर तालुक्यातील शेडगाव येथील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पुर आल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. येथे देखील पथकातील सदस्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले.

पथकाने नुकसानीची माहिती घेतली

सेलू तालुक्यातील गोंदापूर येथील पाहणी केल्यानंतर पथक वर्धा विश्रामगृह येथे दाखल झाले. याठिकाणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ही माहिती दिली. हिंगणघाट येथे विश्रामगृह येथे आमदार समीर कुणावार यांनी पथकाची भेट घेतली व नुकसानीबाबत चर्चा केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button