T20 Ranking : स्मृती मानधनाची तिस-या स्थानी धडक! | पुढारी

T20 Ranking : स्मृती मानधनाची तिस-या स्थानी धडक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. याच्या जोरावर ती टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंगमध्ये (T20 Ranking) पोहोचली आहे. आयसीसी ने नुकतीच नवी क्रमवारी जाहीर केली. यात मानधना तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृतीने शानदार अर्धशतक झळकावले आणि भारताला सहज विजय मिळवून दिला. या खेळीच्या जोरावर तिने न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनला मागे टाकले असून ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीशी बरोबरी केली आहे. मेग लॅनिंग अजूनही क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.

मनधाना वनडे फॉरमॅटमध्ये अव्वल

वनडे फॉरमॅटमध्ये मानधनाने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. 2019 मध्ये, तिच्या कारकिर्दीत प्रथमच, ती आयसीसी टी 20 क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ती याआधी टी-20 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. (T20 Ranking)

हरमनप्रीत चौथ्या क्रमांकावर

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनेही 4 क्रमांकाने प्रगती केली आहे. ती 14 व्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 64 चेंडूत 91 धावा करणाऱ्या न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने दोन स्थानांची प्रगती केली आहे. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू अॅशले गार्डनर तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीत पुढे आहे. विशेष म्हणजे भारताविरुद्धच्या सामन्यात गार्डनरने शानदार खेळी केली होती. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट तिसरे स्थान गाठले आहे. (T20 Ranking)

गोलंदाजांच्या क्रमवारीत बदल

ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकीपटू जेस जॉन्सनने तिच्या क्रमवारीत दोन क्रमांकाने सुधारणा केली आहे. या यादीत इंग्लंडची सोफी ॲक्लेस्टन अव्वल स्थानावर आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताविरुद्ध गोलंदाजी करताना जॉन्सन हिने 22 धावांत 4 बळी घेतले होते. भारतीय मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18 धावांत चार बळी घेतले. आयसीसीच्या नव्या क्रमवारीत रेणुका 49 व्या स्थानावर आहे.

Back to top button