Video: अकोला शहरातील भुयारी मार्गाचे पितळ पडले उघडे | पुढारी

Video: अकोला शहरातील भुयारी मार्गाचे पितळ पडले उघडे

अकोला : पुढारी वृत्तसेवा : शहरात टॉवर चौक ते गांधी रोडपर्यंत असलेला भुयारी मार्ग आज बुधवारी, १३ जुलै रोजी तलावाचे स्वरुप आले होते. यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. शेवटी महापालिका प्रशासनाने मोटारपंपद्वारे पाणी काढून पाण्याची वाट मोकळी करून दिली. अकोला शहरातील विकास कामाचा ठेका दिलेल्या झेंडू कन्स्ट्रक्शन कंपनीने उड्डाणपूलासह अंडरपासचे काम केले होते.

२८ मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपूल व अंडरपासचे लोकार्पण झाले. दोन महिन्यातच या कामाचे पितळ यानिमित्ताने उघडे पडले आहे. अकोला विकास मार्गाकडे जात असल्याचे भासवून फोटोसेशन करून या उड्डाण पुलाचे व अंडरपासचे उद्घाटन तर लोकप्रतिनिधींनी करून घेतले. मात्र आता नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे कोणालाही पाहण्यास वेळ नाही. संबधित कंत्राटदार झेंडू कन्स्ट्रक्शन कंपनी बिले घेऊन गायब झाली आहे.

नागरिकांच्या रोषाचा सामना मात्र अकोला महापालिका प्रशासनाला करावा लागत आहे. शेवटी नागरिकांची अडचण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने मोटारपंप लावून अंडरपासमधील पाणी बाहेर काढले. पाणी बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागला. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

Back to top button