गुणरत्न सदावर्ते पुन्हा महाराष्ट्र वारीवर ? अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका ! | पुढारी

गुणरत्न सदावर्ते पुन्हा महाराष्ट्र वारीवर ? अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका !

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांच्या बाजुने लढणारे वकील ॲड. गुणवंत सदावर्ते यांना अकोट न्यायालयाने दिलेला अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष विजय मालोकार यांनी ही याचिका दाखल केली आहे.

एसटी महामंडळाच्या ७० हजार कर्मचार्‍यांना फसविल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील अकोट येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना २२ एप्रिलला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या जामीन आदेशाला आव्हान देणारी ही याचिका नागपुर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

याचिकाकर्ते विजय मालोकार यांच्या म्हणण्यानुसार गुणवंत सदावर्ते यांनी ७० हजार एसटी कर्मचार्‍यांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अकोट सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना त्यांचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ध्यानात घेतला नाही. सदावर्ते यांची पोलीस कोठडी घेऊन त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. अटक पुर्व जामीन मिळाल्यानंतर ते दरम्यानच्या कालावधीचा काही गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुणवंत सदावर्ते यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा अशी विनंती मालोकार यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणात अॅड. गुणरत्न सदावर्ते याना यापुर्वी जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, हल्ला प्रकरणात घटनास्थळावरुन अटक झालेल्या कर्मचाऱ्यांनाही जामीन मिळाला आहे. या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते हे मुख्य आरोपी तर इतर कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आले आहे.

Back to top button