चंद्रपूर : स्टेट बँक ऑफ इंडियाची १४ कोटींची फसवणूक; १५ जणांना अटक | पुढारी

चंद्रपूर : स्टेट बँक ऑफ इंडियाची १४ कोटींची फसवणूक; १५ जणांना अटक

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : बनावट आयकर रिटर्न तयार करून चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या बँकेच्या कार्यक्षेत्रात 11 कर्जधारकांनी 14 कोटी 26 लाखांच्या गृहकर्जाची उचल केली आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या मूल्यांकनामध्ये वाजवीपेक्षा अधिक गृहकर्जे देण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या 3 अधिकाऱ्यांसह 11 कर्जधारक आणि 1 एजंटला फसवणूक केल्याप्रकरणी काल सोमवारी (28 फेब्रुवारी 2022) ला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने बँकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सगळ्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये  दि. 8 मार्च 2020 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा कार्यालय चंद्रपूरचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग अरुणकुमार भागवतकर यांचे लेखी तक्रारी वरून अप क. 267 / 2020 कलम 420, 406, 409, 417, 420, 465, 466, 467, 468, 471, 120 (ब) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाकडे 44 कर्ज प्रकरणात कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंट मार्फत गृह कर्जासाठी अर्ज केले होते.

या प्रकरणी कर्ज प्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मुल्यांकनापेक्षा जास्तीच्या रक्कमेचे गृहकर्ज वाटप करण्यात आले. कर्ज वाटपानंतरच्या तपासणीमध्ये बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना बँकेची 14 कोटी 26 लाख 61 हजार 700 ची फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनला तकार दाखल केली होती.

सदर गुन्ह्याचा तपास प्रकरणात कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून बँकेस सादर केल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात तीन बँकेच्या अधिकाऱ्यांसह 11 कर्जधारक व एका एजंटला अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये श्वेता महेश रामटेके (वय-४२, रा. पंचशिल चौक वार्ड क्र. १ बाबुपेठ चंद्रपूर), वंदना विजयकुमार बोरकर (वय -४०, वर्ष रा.नगिनाबाग चोर खिडकीजवळ चंद्रपूर), योजना शरद तिरणकर (वय-४२ रा. डिसके ग्रिन डुप्लेक्स नं. २५ म्हाडा कालनी दाताळा चंद्रपूर), शालिनी मनिष रामटेके (वय-४५ वर्ष  रा. भंगाराम वार्ड भद्रावती), मनिष बलदेव रामटेके (वय-४७ रा. भंगाराम वार्ड भद्रावती), मनिषा विशाल बोरकर रा. आंबेडकर वार्ड भद्रावती), वृंदा कवडु आत्राम (वय-४९ रा. डिसके कॉलनी बोर्डा वरोरा ता. वरोरा), राहुल विनय रॉय (वय -३६  रा. हॉटेमट कॉलनी माजरी), गजानन दिवाकर बंडावार (वय-३९ रा. धाबा), राकेशकुमार रामकरण सिंग (वय -४२ रा. सास्ती राजुरा), गणेश देवराव नैताम (वय-३६ रा. पोंभुर्णा ह.मु. कोसारा), गिता गंगादिन जागेट (वय-५३) रा. घुग्घुस), पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी (वय-३९ रा. ह.मु. प्लॉट निर्माण नगर तुकुम चंद्रपूर), विनोद केशवराव लाटेलवार (वय-३८ रा. ह. मु. हनुमाननगर तुकूम चंद्रपूर), देवीदास श्रीनिवासराव कुळकणी (वय-५७ वर्ष रा. मुकूंदनगर) अकोला यांचा समावेश आहे. यांना अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक मस्के करीत आहेत.

Back to top button