सेनगाव नगराध्यक्ष कोण होणार? तिन्‍ही पक्षांकडून अर्ज सादर | पुढारी

सेनगाव नगराध्यक्ष कोण होणार? तिन्‍ही पक्षांकडून अर्ज सादर

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव येथील नगरपंचायत निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला लागला. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपकडून प्रयत्न सुरू होते. सध्या राष्ट्रवादी आणि सेनेची युती जरी झालेली असली तरी मात्र तिन्‍ही पक्षांकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज सादर करण्यात आले आहेत.

सेनगाव नगरपंचायत निवडणूक होऊन आज तीन आठवडे उलटले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सदस्यांची जुळवाजुळव सुरू होती. सेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांकडे प्रत्येकी पाच जागा असल्यामुळे कुठले पक्ष सत्तेत येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता सेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असून मंगळवारी (ता.०८) निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे राष्ट्रवादीच्या वतीने शालिनीताई देविदासराव देशमुख तर शिवसेनेकडून ज्योती जगदीश देशमुख यांनी अर्ज सादर केले आहेत. तर भाजपाकडून मीरा सतीश खाडे यांनी आपला अर्ज प्रशासनाकडे सादर केला आहे.

नगराध्यक्ष पद नेमकं कुणाकडे जाणार याची उत्सुकता सेनगावकरांना आहे. कारण तीन पक्षांनी आपले अर्ज सादर केल्यामुळे भाजपच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सव्वा-सव्वा वर्षांचा करार जरी झालेला असला तरी मात्र सेनगावचे राजकारण हे जिल्हा ठिकाणावरून चालत असल्याने या ठिकाणी वेगळे चित्र पहायला मिळते की काय, असा प्रश्न पडत आहे. कारण भाजपने देखील अध्यक्ष पदाचा अर्ज सादर केल्यामुळे आमदाराच्या सत्ता समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागीलवेळी सेना, मनसे व काँग्रेसने युती करून त्यांच्यात करार झाला होता. मात्र ऐनवेळी भाजपाने आपली चाल यशस्वी करून राष्ट्रवादी आणि सेनेला सोबत घेऊन नगराध्यक्ष पद आपल्या ताब्यात घेतले होते. त्यामुळे यावेळी भाजपाच्या खेळीकडे लक्ष लागून आहे. आता या तीन पक्षांपैकी नगराध्यक्ष पद कुणाला मिळणार याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button