चंद्रपूर : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील २ जण जागीच ठार | पुढारी

चंद्रपूर : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील २ जण जागीच ठार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा  

हायवा ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) सायंकाळी घडली. कोरपना तालुक्यातील कवठाळा येथे गडचांदूर घुगुस जिल्हा महामार्गावर साडेपाच वाजण्याच्या सुमारास भरधाव हायवा ट्रकने कवठाळा स्टेट बँकेच्या समोर गडचांदूर वरून भोयगावला परत जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीचालक विठ्ठल गुंजेकर व सहकारी पुरुषोत्तम निर हे जागीच ठार झाले. सदर घटनेची माहिती मिळताच कवठाळा गावचे सरपंच नरेश सातपुते हे आपल्या सहकार्‍यांसोबत घटनास्थळी पोहोचले. ट्रक चालक फरार झाल्याचे कळताच सरपंच नरेश सातपूते यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या दुचाकीने आपल्या साथीदारांसह वनसडी येथे तीस किलोमीटर अंतरावर पाठलाग करत नांरडा फाट्याजवळ ट्रकला पकडले.

सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना दिल्यानंतर ठाणेदार सत्यजित आमले, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, अंमलदार चरणदास मडावी यांनी, ट्रक ताब्यात घेत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मागील दोन वर्षापासून गाव ते गडचांदूर या जिल्हा महामार्गाचे काम अगदी संथ गतीने सुरु असल्यामुळे या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले, तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप सरपंच नरेश मदन सातपुते यांनी केला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button