गुजरातवरून आदेश आल्‍यानंतर ठाण्याची उमेदवारी समजणार : आदित्‍य ठाकरे | पुढारी

गुजरातवरून आदेश आल्‍यानंतर ठाण्याची उमेदवारी समजणार : आदित्‍य ठाकरे

ठाणे : पुढारी वृत्तसेवा ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार कि मिंदेना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजणार अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ही लढाई बाप आणि पक्ष चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या तसेच महाराष्ट्राला दिल्लीत झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. उबाठा पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.
महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसताना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी मात्र जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.

राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर उन्हात कारकर्त्यांची गर्दी झाल्याने हे शक्तिप्रदर्शन नव्हे तर हे प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे. ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या,संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तर महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याचे आदित्य ठाकरे यांना विचारले असता, ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार कि मिंदेना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजणार असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आपल्या प्रचारात बाजी मारली आहे. राज्यात ठाणे लोकसभेला महत्त्व प्राप्त झाल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजन विचारे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. राजन विचारे यंदा हॅट्रिक करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याकरता हजारोच्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भर उन्हात प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हेही वाचा : 

Back to top button