Ganpat Gaikwad firing Case : आमदार गायकवाड गोळीबार प्रकरणाला राजकीय कलाटणी; भाजप कार्यकर्त्यांचा गुप्त बैठकीत ठराव | पुढारी

Ganpat Gaikwad firing Case : आमदार गायकवाड गोळीबार प्रकरणाला राजकीय कलाटणी; भाजप कार्यकर्त्यांचा गुप्त बैठकीत ठराव

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे. आमदार गायकवाड आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील पराकोटीच्या वादामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील वाद गोळीबार घटनेनंतरही धुमसत आहे. Ganpat Gaikwad firing Case

त्यामुळे भाजपमध्ये शिंदे शिवसेनेत असलेली नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. एकीकडे शिवसेनेकडून महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ शहरात बॅनर लावले जात आहेत. तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांच्या कल्याणमध्ये पार पडलेल्या बैठकीत आमदार गायकवाड यांना पाठिंबा देऊन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. Ganpat Gaikwad firing Case

मंगळवारी कल्याण पूर्वेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोजक्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. यापुढे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांसह सरकारच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतील बॅनरवर शिंदेंसह सेनेतील नेत्यांचे फोटो लावण्यात येणार नाही. या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडणार असल्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपतील हा वाद कसे राजकीय वळण घेतो ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना २ फेब्रुवारीरोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. हिंसाचाराच्या या घटनेला जमिनीचा वाद जरी कारणीभूत ठरला असला तरीही त्याचे मूळ खूप आधीपासून रूजत होते हे उघड आहे. एकीकडे राज्यात भाजप-शिवसेना युती असली तरी दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना असेच वातावरण वारंवार उद्भवणाऱ्या घटनांतून स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. कोणत्याही उपक्रमात वा विकासकामांत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आडकाठी केली जात असल्याची खदखद यापूर्वी अनेकदा भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आणि भाजपमधील खदखद बाहेर पडली. मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची बदली करा, अन्यथा शिवसेनेला सहकार्य न करण्याच्या भूमिकेचा ठराव त्यावेळी डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पदाचा राजीनामा देण्यास तयार झाले होते. या घटनेनंतर यात वरिष्ठांनी मध्यस्थी करून चिघळलेले प्रकरण थंड केले होते. मात्र, या भूमिकेवर स्थानिक पातळीवरील पदाधिकारी खुष नसल्याचे बोलले जात होते.

कल्याण पूर्वेत भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात सातत्याने वादाच्या ठिणग्या उडत असतात. रस्त्यांच्या बांधकामांपासून विकास निधी ते अगदी गटाराच्या झाकणापर्यंत वाद कायम दिसून आले आहेत. दोघांनी रस्त्यावर उतरत एकमेकांना आव्हान दिले होते. त्यावेळी देखील तो वाद काहीसा निवळला होता. द्वारलीतील जमिनीचा वाद पराकोटीच्या दिशेने पावले टाकत होता. अखेर या वादाने हिंसाचाराचे टोक गाठले. महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करून आमदार गायकवाड यांनी या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

मात्र गोळीबारातून महेश गायकवाड बालंबाल बचावले आहेत. आमदार गायकवाड सद्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांची क्राईम ब्रँचकडून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एकीकडे मित्र पक्षांचे दोन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी जरी असले तरी दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण तापले आहे.

Ganpat Gaikwad firing Case  समाजमाध्यमांवर बॅनर वॉर

समाज माध्यमांवर दोन्ही गायकवाडांच्या समर्थकांकडून बॅनर वॉर सुरू झाला आहे. महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. हल्ल्याचा निषेध करत हल्ला करणाऱ्यांचा देखील शिवसेना समर्थकांनी जाहीर निषेध केला आहे. तर दुसरीकडे आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटून आल्याचे बोलले जाते.

लवकरच बैठकीत शिक्कामोर्तब

येत्या 10 तारखेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजपातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शिवसेना नेत्यांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात योग्य वेळी जाहिर भूमिका मांडू, असे नाव न छापण्याच्या अटीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा 

Back to top button