Gaikwad Firing Case: गायकवाडांची रक्तरंजीत भाऊबंदकी | पुढारी

Gaikwad Firing Case: गायकवाडांची रक्तरंजीत भाऊबंदकी

ठाणे : दिलीप शिंदे

कल्याण पूर्व विधानसभेचे पंधरा वर्ष आमदार असलेले गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड या चुलत भावांमधील वाद कल्याणकरांसाठी नवीन नाही. या गायकवाड बंधूंचे होणारे राजकीय आणि खासगी वाद हे जगजाहीर असून दोन महिन्यांपूर्वीच अशी रक्तरंजित होणारी दुर्घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली होती. अखेर एका बिल्डरला शेतकऱ्यांकडून जमीन मिळवून देण्याच्या भानगडीत एका भावाने दुसऱ्या भावावर चक्क पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या आणि दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाले. या घटनेने पुन्हा एकदा तिसगांवमधील रक्तरंजित घटनांच्या आठवणीने कल्याणकरांच्या अंगावर शहारे उमटत आहेत. (Gaikwad Firing Case)

कल्याणमध्ये केबलचा व्यवसाय करता करता गणपत गायकवाड हे गणपत शेठ बनले. २००९ मध्ये विधानसभेच्या पुनर्रचनेनंतर कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी शिवसेना उमेदवार पुंडलिक म्हात्रे यांचा साडे चोवीस हजार मतांच्या फरकांनी पराभव केला होता. या विजयात केबल व्यवसाय आणि आगरी कार्ड हे निर्णायक ठरले होते. त्यानंतर गायकवाड यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. २०१४ मध्ये पुन्हा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि शिवसेना उमेदवार कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांचा अवघ्या ७४५ मतांच्या फरकाने विजय मिळविला. (Gaikwad Firing Case)

राज्यात सत्ता बदल झाला आणि गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा दिला आणि गायकवाड हे भाजपच्या गोटात शिरले. त्यांचे बंधू अभिमन्यू गायकवाड यांना भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष बनवून भाजपची सारी सूत्रे आमदार गायकवाड यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळेच २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या कमळावर निवडणूक लढवून गायकवाड यांनी विजयाची हॅट्रिक साधली. आमदारांचे वजन वाढत असताना त्यांच्या भावकीतील चुलत बंधू महेश गायकवाड यांचीही राजकीय इच्छा वाढू लागली. (Gaikwad Firing Case)

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला महेश गायकवाडने कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लढविली आणि शिवसेना नगरसेवक म्हणून राजकीय वर्तुळात वावर सुरु केला. त्यानंतर महेशने मागे पाहिलेच नाही. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून महेश गायकवाड हे नावारूपाला आले आणि त्यातून आमदारांशी खटके उडू लागले. विकास कामांवरून दोघांची होणारी भांडणे अनेकदा पोलीस ठाण्यापर्यंत गेली होती. एवढेच नाही तर या भांडणाच्या तक्रारी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. विकास कामांवरून दोन महिन्यापूर्वी दोघांनी एकमेकांना आव्हान देऊन ड प्रभाग समितीसमोर येण्याचे आव्हान दिले होते. आमदार गणपत गायकवाड हे शेकडो कार्यकर्त्यांसह पोहचले होते. महेश गायकवाड ही आपल्या समर्थकांसह येत असताना कोळसेवाडी पोलिसांनी सतर्कता बाळगून महेशला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. अन्यथा तिथेच दंगल घडून मोठा अनर्थ घडला असता.

विकास कामांसह तिसगांवमधील तिसाई मंदिर व्यवस्थापनाच्या वादाची किनार ही या दोघांमधील दरी वाढण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आमदार गायकवाड यांनी अनेकदा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात भूमिका घेतल्या होत्या. त्यात भर पडली ती द्वारली गावातील जमिनीच्या वादाची. एकनाथ जाधव यांच्या मालकीचा तो एक भूखंड होता. हा भूखंड एका गुजराती बिल्डरला विकण्यात आला असून रीतसर कागदपत्रे न झाल्याने शेतकऱ्यांकडून कब्जा मिळत नव्हता. त्यामुळे संबंधित बिल्डरने महेश गायकवाड यांच्याकडे मदत मागितली. दुसरीकडे तोच बिल्डर आमदार गणपत गायकवाड यांच्याकडेही गेला होता. त्यामुळे जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी दोघांकडून प्रयन्त झाले आणि हा वाद उफाळून आला.

दुसरीकडे हा भूखंड गणपत गायकवाड यांच्या कंपनीने 1996 मध्ये विकत घेतला होता. तीन वेळा पैसे घेऊन ही जाधव कुटुंब हे नोंदणी कार्यालयात येत नसल्याने न्यायालयातून या भूखंडाची मालकी मिळवली,असे गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे. या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास महेश गायकवाड आणि त्यांच्या दोनशे ते तीनशे समर्थकांनी या भूखंडात घुसून कुंपणाचे नुकसान केले आणि त्याची तक्रार करण्यासाठी आमदारांचे पुत्र वैभव गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र पोलीस तक्रार घेण्यात आली नाही. कारण महेश गायकवाड हे आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले होते. तक्रार घेत नसल्याचे एकूण आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात बसले असताना वैभवला काही कार्यकर्त्यांनी धक्क्काबुकी केल्याचे समजताच आमदार गायकवाड आणि त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षक केणे यांनी समोर खुर्चीवर बसलेल्या महेश आणि त्यांचा मित्र राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडून बदला घेतला.

या गोळीबारामुळे तिसगांवमध्ये पुन्हा हल्ले -प्रतिहल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंधरा वर्षांपूर्वी असेच हे हल्ले आणि खुन झाल्याने तिसगांव बदनाम झाले होते. शिवसेनेच्या दोन शाखा प्रमुखांच्या घडलेल्या हत्याही कल्याणकरांनी पहिल्या आहेत. त्या हत्येप्रकरणी भाजपचे दोन कार्यकर्त्यांनी जन्मठेपीची शिक्षा भोगलेली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आता तिसाई मंदिराची यात्रेतील भांडणे थांबली होती. हळदीमधील दुर्घटना थांबल्या होत्या. आता पुन्हा तिसगांवमध्ये भाजप आणि शिवसेना वाद आणि भाऊबंदकी सुरु झाल्याने ग्रामस्थांना धडकी भरली असल्याचे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा :

Back to top button