Thane : दुर्गाडी किल्ला खासगी संस्थेच्या नावावर करण्याचा डाव | पुढारी

Thane : दुर्गाडी किल्ला खासगी संस्थेच्या नावावर करण्याचा डाव

डोंबिवली :पुढारी वृत्तसेवाछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला खासगी संस्थेच्या नावावर करण्याचा डाव महसूल खात्यातील चाणाक्ष अधिकाऱ्यांनी उधळून लावला आहे.(Thane )

सातवाहन राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचे सांगून पिढ्यान् पिढ्या वंश परंपरागत मालकी हक्क असल्याचा दावा करत एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याने ऐतिहासिक ठेवा असलेल्या या किल्ल्याला स्वतःच्या संस्थेच्या नावावर करण्यासाठी चक्क तहसीलदारांच्या स्वाक्षरी आणि शिक्क्यांसह बनावट लेटरहेडचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संपूर्ण किल्ला संस्थेच्या नावावर करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकीकडे कल्याणात एकच खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक तथा तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संदर्भात महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह दाखल केलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.प्रिती भास्कर बुडे (४५) या कल्याणच्या मंडळ अधिकारी असून त्यांनी या संदर्भात कागदोपत्री पुराव्यांसह दाखल केलेल्या फिर्यादीवरून माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचे अध्यक्ष सुयश शिर्के (सातवाहन) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी प्रिती घुडे यांनी कल्याण तहसीलदारांच्यावतीने ही फिर्याद दाखल केली आहे. १२ सप्टेंबर २०२२ ते दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी दरम्यानच्या कालावधीत माळशेज, नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचे अध्यक्ष सुयश शिर्के (सातवाहन) यांनी मौजे कल्याण येथील कब्जेदार सदरी दुर्गाडी किल्ला असे नाव दाखल असलेल्या सर्व्हे नंबर ३३८ (एकूण क्षेत्र १-१६-०० हेक्टर आर) ही जमीन समितीच्या नावावर दाखल करण्यासाठी २६ जून २०१४ रोजी कल्याणच्या तहसीलदार कार्यालयात अर्ज दिला होता. सदर अर्जासोबत अर्जदाराने काही दस्तऐवज जोडले होते. या दस्तऐवजांमध्ये दुर्गाडी किल्ल्याचा ७/१२ उतारा, फेरफार याचाही समावेश होता. हा किल्ला माळशेज, नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीच्या नावे करण्यात यावा, या संदर्भात ८ मे २०२१ तारखेचे पत्र जोडण्यात आले होते.

Thane : संशयास्पद कागदपत्रे

अर्जदाराने अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्रे संशयास्पद, बनावट, बोगस आणि दिशाभूल करणारी असल्याचे कार्यालयातील अभिलेख तपासल्यानंतर दिसून आले. तहसील कार्यालयामार्फत चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयास तोपर्यंत कोणताही अहवाल सादर करण्यात आ लेला नव्हता. त्यानंतर २ मे | २०२३ रोजी लेखी पत्र बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना चौकशीसाठी पाठविण्यात आले.

वारसाचा कोणताही स्पष्ट पुरावा नाही

मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी अर्जासोबत अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करून अहवाल सादर केला. सर्व्हे नं. ३३८ (क्षेत्र १- १६-० हेक्टर आर) या क्षेत्रावर दुर्गाडी किल्ला असून गाव नमुना नं. ७/१२ सदरी दुर्गाडी किल्ला अशी नोंद आहे. अर्जदार सुयश शिर्के सातवाहन (सातवाहन राजांचे वंशज आणि वारसदार) यांनी किल्ले दुर्गाडीच्या ७/१२ सदरी समितीचे नावे दाखल असलेला कोणत्याही प्रकारचा नोंदणीकृत दस्त सादर केला नाही.

Back to top button