स्पर्धेच्या युगात उन्हाळ्याच्या सुटीत मामाचे गाव होतेय पोरके | पुढारी

स्पर्धेच्या युगात उन्हाळ्याच्या सुटीत मामाचे गाव होतेय पोरके

वागळे; अर्जुन चेमटे :  शैक्षणिक वर्ष सरता सरता वार्षिक परीक्षा संपली रे संपली की उन्हाळ्याच्या सुट्यांची मुले आतुरतेने वाट पाहत असतात. उन्हाळ्याच्या सुट्या म्हटले की वर्षभर शाळा व अभ्यास यांत गुंतल्यामुळे मुले मामाच्या गावाला जाण्यासाठी तयारच असतात. कारण मामाच्या गावी आई पेक्षा जास्त जीव लावला जातो, लाड-प्रेम केले जाते, हट्ट पुरविले जातात. एवढेच नव्हे तर सर्वच स्वातंत्र्य मिळालेले असते. मामाच्या गावी गेल्यावर तेथील शेती, शिवार, शेतीतील विहीर, तलाव येथे मनसोक्त फिरण्याचा आनंद घेणे तासंतास विहिरीत पोहणे, कैऱ्या खाणे, विविध प्रकारचे खेळ खेळणे असे एक ना अनेक प्रकारच्या मौज मस्ती करायला मिळत असतात म्हणून मुलांना मामाच्या गावी जाण्याचे वेध लागलेले असतात. परंतु स्पर्धेच्या युगात उन्हाळ्याच्या सुटीतील मामाचे गाव पोरके होत चालले आहे.

शहरात मुलांना शेती, शेतीचे प्रकार, मातीचे प्रकार, पिकांची लागवड, झाडे फुले, फळे, विविध शेतीपूरक व्यवसाय, पक्षी, जनावरे, नाते संबंध, कुटुंब पद्धती हे सर्व पुस्तकी ज्ञान मामाचे गाव शिकवते. यासाठी कुठल्याही क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची गरज नसते. हे प्राथमिक शिक्षण मुलांना मिळणे गरजेचे आहे. आणि हे शिक्षण मामाच्या गावी नकळतपणे मिळते. मामाचे गाव
शिक्षणाबरोबर व्यायामशाळा सुद्धा आहे याठिकाणी मुले वडाच्या पारंब्याचा झोका खेळणे, आंब्याच्या झाडावर आंबे खाण्यासाठी चढणे, झाडावर सूरपारंब्या चा खेळ खेळणे, विटी-दांडू, पकडा-पकडी, सायकल यासारख्या खेळांमधून मुलांच्या शारीरिक तसेच मानसिक व्यायाम होतो. मामाचा गाव ही सध्याची कृतीयुक्त आणि हसत-खेळत शिक्षणाची पद्धती आहे. खेळ, कृती, उपक्रम आणि मुक्त शिक्षण हे नवीन शैक्षणिक धोरणातील हे उद्दिष्टे मामाचे गाव पूर्ण करते असे शैक्षणिक संस्थेतील जाणकार सांगतात.

Back to top button