‘टेट’ च्या निकालाकडे भावी शिक्षकांचे लागले लक्ष; २४ मार्चला जाहीर होणार निकाल | पुढारी

'टेट' च्या निकालाकडे भावी शिक्षकांचे लागले लक्ष; २४ मार्चला जाहीर होणार निकाल

खोडाळा: दीपक गायकवाड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर होणार असून, निकालाबाबत भावी शिक्षकांचे लक्ष लागले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ग्रामीण भागातूनही शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना टेट परीक्षेच्या काठिण्य पातळीचा चांगलाच अनुभव आला. मात्र, वर्षभर अभ्यास केलेल्या उमेदवारांमध्ये निकालाची कमालीची उत्सुकता वाढली असून निकालाकडे लक्ष लागले आहे. परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याने व मागील परिक्षेत घसर लेल्या निकालाची पृष्ठभूमी पाहता यंदा निकाल किती लागतो. या बाबीकडे परीक्षार्थी उमेदवारांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेली व बहुचर्चित आणि डीएड, बीएड पदवी पात्रता धारकांसाठी आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता पात्रता चाचणी (टेट) मागील महिन्यात पार झाली. ही परीक्षा देणाऱ्या भावी गुरुजींना पेपरमधील इंग्रजी विषयाच्या प्रश्नांनी घाम फोडला. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ तर समाजशास्त्रातील प्रश्न अतिशय किचकट असल्याचे परीक्षार्थीनी सांगितलं आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी २० ते ३० टक्के प्रश्न सोडविलेलेच नसल्याची माहिती पुढे येत आहे.

परीक्षा देणाऱ्या बहुतांश विद्याथ्र्यांनी पेपर अवघड गेल्याचे एकमेकांना सांगत आहेत. २०० गुणांच्या पेपरसाठी १२० मिनिटांचा मिळालेला अवधी अत्यंत अपुरा असल्याचे परीक्षार्थी सांगतात. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या विषयांवर या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. ते समजावून घेऊन सोडविण्यासाठीच वेळ अपुरा पडल्याचे मत परीक्षार्थीनी व्यक्त केले.

त्याचप्रमाणे किचकट भाषेत प्रश्न विचारल्यामुळे ते समजण्यात अधिक कालावधी गेल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एकूण २०० गुणांसाठी झालेली ही परीक्षा अवघ्या १२० मिनिटांची होती त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रश्न पाहता ही आले नसल्याचे चित्र आहे त्यातच गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांवर भर असल्याने कला शाखेच्या उमेदवारांची तारांबळ उडाली होती. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच निवड होणार असल्याने निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. परीक्षा ऑनलाईन असल्याने निकालही तातडीने लागणे अपेक्षित आहे.

पवित्र पोर्टलवर करावी लागणार नोंदणी….

टीएआयटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होणार असून उमेदवारांना प्राधान्य क्रम नोंदवावे लागणार आहे. गुणानुक्रमे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्ता यादीतील उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे.

Back to top button