कसबा पोट निवडणूक बिनविरोध होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

कसबा पोट निवडणूक बिनविरोध होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पोट निवडणूक असेल तर उमेदवार द्यायचा नाही ही आपली महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. अंधेरीत झालेल्या पोट निवडणुकीवेळी राज ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेल्‍या आवाहनाला प्रतिसाद देत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे आता ही निवडणूक देखील बिनविरोध होईल अशी आशा आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे बोलताना व्‍यक्‍त केला.

माघी पौर्णिमेनिमीत्त भरवण्यात येणाऱ्या मलंगगड यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्‍थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते गडावर मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीसमोर महाआरती करण्यात आली. ही यात्रा गेली अनेक वर्ष सुरू असून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा सुरू करण्यात आली होती.

दिघे यांचा मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांनी दिघेंची ही परंपरा कायम राखली. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या हस्ते प्रथमच या गडावर महाआरती करण्यात आली. पुढील वर्षी भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्‍वााहीही मुख्‍यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

Back to top button