ठाणे : टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलमध्येच बाळाचा जन्म | पुढारी

ठाणे : टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलमध्येच बाळाचा जन्म

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा : प्रसूतीसाठी आपण एखाद्या चांगल्या रुग्णालयाची निवड करतो. मात्र, गावातून शहरी विभागाच्या रुग्णालयात येण्यासाठी गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शुक्रवारी (दि.२) पहाटेच्या सुमारास अशीच घटना घडली आणि एक महिलेने चक्क रेल्वेमध्येच गोंडस बाळाला जन्म दिला.

प्रिती वाकचौरे असे या महिलेचे नाव आहे. ही गरोदर महिला आटगाव येथून मुंबईच्या दिशेने रुग्णलयात दाखल होण्यासाठी निघाली. ही महिला फर्स्ट क्लास मध्ये बसली होती. तिच्या समवेत तिचे नातेवाईकही बसले होते. मात्र, रेल्वे टिटवाळा स्थानकात पोहचते ना पोहचते तोच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिच्यासमवेत प्रवास करणाऱ्या काही महिलांनी याबाबतची माहिती तत्काळ रेल्वे पोलिसांना दिली. महिला रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांनी तत्काळ टिटवाळा रेल्वे स्थानकात धाव घेतली. या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. तिची व बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोघांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button