माठ बनतोय उच्चवर्गीयांचाही फ्रिज..! उकाड्याने नागरिक त्रस्त | पुढारी

माठ बनतोय उच्चवर्गीयांचाही फ्रिज..! उकाड्याने नागरिक त्रस्त

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. मागील पंधरा दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या वर जात असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. फ्रिजमधील थंड पाण्यापेक्षा माठातील पाणी पिल्याने आरामदायी वाटत असल्याने आता माठ गरिबांचा नाही तर उच्चवर्गाचाही फ्रिज ठरू लागला आहे. प्रत्येक रस्त्यावरील माठ विक्रीच्या दुकानांवर आता गर्दी दिसू लागली आहे.
उन्हाच्या तीव्रतेने मुंढवा, घोरपडी, केशवनगर व कोरेगाव पार्क भागातील रस्ते दुपारच्या वेळी ओस पडलेले दिसून येतात. एप्रिल महिना हा सर्वाधिक उष्णतेचा ठरला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तापमान नियंत्रणावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे माठांना मागणी वाढली आहे. माठांच्या किमतीही वाढल्याने सामान्यांचे थंड पाणीही महाग झाले आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
एकेकाळी शहरांमधील कुंभारवाड्यात जाऊन माठ खरेदी करावे लागत होते. महागाईने कळस गाठल्याने माठांच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. रोजंदारीवर काम करून जीवन जगणार्‍या मजूर वर्गाला तुलनेने हजेरी कमी मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने थंड पाण्यासाठी माठ खरेदी करण्यासाठी एका दिवसाची मजुरी द्यावी लागत असल्याचे कष्टकरी वर्गातील नागरिकांनी सांगितले.
माठ विक्रेते हातगाडीवरून मुख्य रस्ता तसेच गल्लीबोळांमध्ये जाऊन माठ विक्री करू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत माठांच्या किमतीमध्ये वाढ झाली असली तरी खरेदीदारांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

किमती 20 टक्क्यांनी वाढल्या

माठांच्या किमती गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. काळा छोटा माठ गेल्या वर्षी 180 रुपये होता, तो आता 220 रुपये तर लाल माठ 200 रुपयांवरून 240 रुपये झाला आहे. तसेच, तोटी बसविलेला काळा माठ 220 रुपयांवरून 250 रुपयांवर तर तोटी असलेला लाल माठ 240 रुपयांवरून 280 रुपये झाला आहे. रंगरंगोटी व नक्षीकाम केलेल्या माठांना मागणी जास्त आहे.
केशवनगरमधील कुंभारवाड्यात फक्त गावठी माठ बनतात. त्या माठांना मागणी कमी आहे. त्यामुळे आम्ही गुजरात, राजस्थान व आसाम या ठिकाणी कंपन्यांमध्ये बनलेले माठ मागवितो. गावठी माठ त्या माठांपेक्षा स्वस्त आहे. मात्र, त्या माठांना मागणी जास्त असल्याने आम्ही बाहेरून ते माठ मागवितो.
– महेंद्र बावधनकर,  कुंभारवाडा, केशवनगर
हेही वाचा

Back to top button